नालासोपारा (मंगेश कराळे) : प्रेयसीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठविल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने मित्रांसह २४ वर्षांच्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत प्रियकरासह त्याच्या ५ मित्रांना अटक केली आहे.
मयत तरुण प्रतिक वाघे (२४) हा नालासोपाऱ्याच्या मोरेगाव परिसरातील जिजाईनगर मधील साईकृपा चाळीत राहतो. तो मिरा रोडच्या भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. याच परिसरात राहणार्या एका तरुणीला तो इन्स्टाग्रामवर फॉलो करत होता. त्याने घटनेच्या दिवशी तरुणीला मेसेज करून व्हिडीओ कॉल केला होता.
याची तक्रार तरुणीने तिच्या प्रियकर भूषण पाटील याच्याकडे केली. तेव्हा भूषणने प्रतिकला कॉल करून भेटण्यासाठी बोलावत होता पण तो गेला नाही. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भूषण पाटील हा आपल्या मित्रांना घेऊन मोरेगाव तलावाजवळील रस्त्यावर प्रतिक वाघेला याला गाठले. माझ्या मैत्रीणीला मेसेज का करतो असा जाब विचारला आणि मारहाण करायला सुरवात केली. पाटील याच्या मित्रानेही प्रतिकला मारहाण केली. या मारहाणीची चित्रफितही तयार करण्यात आली होती. त्याला मारहाण करत पोलीस ठाण्यात घेऊन जात होते.
मात्र मारहाणीमुळे तो रस्त्यातच बेशुध्द पडला. प्रतिकला उपचारासाठी विरारच्या बोळींज येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, प्रतिकची प्रकृती खालावल्याने त्याला मिरा रोडच्या भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तुळींज पोलिसांनी भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह ७ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती तुळींज पोलिसांनी दिली.
सदर मारहाण प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पण त्याचा मृत्यू झाल्याने हत्येची कलमे वाढविण्यात आली आहे. अटक आरोपींना २८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध घेत गुन्ह्याचा तपास तुळींज पोलिस करत आहे. - पौर्णिमा चौगुले - श्रींगी, (पोलिस उपायुक्त, परिमंडळ २)