ऑनलाइन टास्क जॉब देण्याच्या आमिषाने योगा शिक्षिकेला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 20:58 IST2024-08-06T20:58:30+5:302024-08-06T20:58:42+5:30
अनोळखी टेलिग्रामधारकाने केली फसवणूक.

ऑनलाइन टास्क जॉब देण्याच्या आमिषाने योगा शिक्षिकेला गंडा
जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ऑनलाइन फसवणुकीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. राबोडी परिसरात राहणाऱ्या ५८ वर्षीय योगा शिक्षिकेला ऑनलाइन टास्क पूर्ण करून दिवसाला हजारो रुपयांच्या कमाईचे आमिष दाखवून अनोळखी सायबर भामट्यांनी दोन लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी मंगळवारी दिली.
राबोडी भागात राहणाऱ्या या योगा शिक्षिकेला २ ते ६ जुलै या काळात मोबाइलवर टेलिग्राममध्ये एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये ऑनलाइन पार्ट टाइम जॉब देण्याची बतावणी केली होती. ऑनलाइन मेसेज केल्यानंतर गुगल रिव्ह्यू टास्क सोडवून दिवसाला तीन ते चार हजार रुपये मिळविण्याचे प्रलोभनही त्याच मेसेजद्वारे दाखविले होते. चांगला जॉब आणि मोठी रक्कम पदरात पडेल, या भाबड्या आशेने महिलेने हे काम करण्याची इच्छाही दर्शवली. त्यानंतर तिच्या मोबाइलवर लिंक आणि मेसेज पाठवून तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. पुढे वेळोवेळी तिच्या बँक खात्यातून दोन लाख ६२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही जॉब न देता सायबर भामट्याने स्वत:चे फोन मात्र बंद करून ठेवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने ५ ऑगस्ट रोजी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.