येवा कोविड सेंटर आपलाच असा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:12+5:302021-05-27T04:42:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेने पाच हजार ४४८ खाटांची व्यवस्था केली. ...

येवा कोविड सेंटर आपलाच असा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेने पाच हजार ४४८ खाटांची व्यवस्था केली. त्यापैकी चार हजार २०६ खाटा सध्या रिकाम्या आहेत. लाट ओसरल्यामुळे ठाणेकरांकरिता ही सुविधा सुरू राहावी व यदाकदाचित तिसरी लाट आलीच तर पुन्हा जमवाजमव करण्याची नामुश्की आरोग्य विभाग व महापालिका यांच्यावर येऊ नये याकरिता होम क्वारंटाईन सुविधा बंद करून प्रत्येक कोरोना रुग्णांवर लक्षणे नसतानाही येथे दाखल होण्याची सक्ती केली आहे.
दि. ६ एप्रिल २०२१ रोजी ठाणे शहरात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक १८८३ रुग्ण एका दिवसात आढळले होते. त्या दिवशी ठाण्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांकरिता ८२८ खाटा उपलब्ध होत्या. मात्र ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध नव्हते. त्या दिवशी ठाण्यात महापालिका व खासगी इस्पितळात उपचार घेणाऱ्यांची संख्या १२ हजार ९८३ होती. परंतु त्याचवेळी लक्षणे नसलेले नऊ हजार २८१ रुग्ण होम क्वारंटाईन होते. राज्य शासनाचा होम क्वारंटाईन सुविधा बंद करण्याचा निर्णय तिसऱ्या लाटेत कायम राहिला तर ठाण्यात २२ ते २५ हजार रुग्णांची सुविधा निर्माण करावी लागेल. म्हणजे सध्याच्या व्यवस्थेच्या चौपट वैद्यकीय सुविधांची तयारी करावी लागेल.
शासनाने ठाण्यासह १८ जिल्ह्यांत होम क्वारंटाईन बंद केले. कळवा येथे म्हाडाच्या माध्यमातून ४०० आणि मुंब्य्रात ४१० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. बुश कंपनीच्या ठिकाणी ६०० खाटांचे, बोरीवडे येथे ३००, व्होल्टास कंपनी येथे एक हजार खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ग्लोबल येथील ११०० आणि पार्किंग प्लाझा येथील ११०० खाटा उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत. ठाण्यात सध्या तब्बल ५ हजार ४४८ बेड असून, त्यातील ४ हजार २०६ बेड रिकामे आहेत. भाईंदरपाडा आणि चार हॉटेल मिळून क्वारंटाईनचे ८९५ बेड उपलब्ध आहेत. भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन केंद्रात एक हजार बेडची व्यवस्था करता येईल. पहिल्या लाटेतही ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील अशा रुग्णांसाठी मानपाडा येथील रेंटलची इमारत, काही शाळांमध्ये १ ते २ हजार बेड उपलब्ध करून देण्यात आले होते. होम क्वारंटाईन बंद केल्यानंतर रुग्णवाढ झाली तर महापालिका पुन्हा अशा पद्धतीने क्वारंटाईन केंद्र तत्काळ उभारू शकते, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, ठाण्यात एप्रिलच्या पहिल्या २५ दिवसांत रुग्णवाढीचा दर अधिक होता. रोजच्या रोज दोन हजारांच्या आसपास रुग्ण आढळत होते. दि. ६ एप्रिल रोजी ठाण्यात सर्वाधिक १८८३ रुग्ण शहरात आढळले होते. त्यावेळी रुग्णांना बेड मिळविण्यासाठी किंवा ज्यांना सौम्य लक्षणे होती अशा रुग्णांसाठी विलगीकरण केंद्रातही खाटा उपलब्ध होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता. याच दिवशी शहरात ४ हजार १२२ खाटांपैकी ३ हजार २९४ खाटा फुल्ल होत्या. केवळ ८२८ खाटा शिल्लक होत्या. परंतु गंभीर रुग्णांकरिता नातलगांना धावाधाव करावी लागत होती. याच दिवशी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ९८३ एवढी होती, तर होम क्वॉरंटाईन रुग्णांची संख्या ९ हजार २८१ एवढी होती.
सध्यादेखील होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या ही ६७८ आहे, तर एकूण बेडची संख्या ५ हजार ४४८ एवढी आहे. त्यामुळे घरी राहू नका, महापालिकेच्या सुविधेचा वापर करा, असा आरोग्य विभागाच्या निर्णयाचा हेतू आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत होम क्वारंटाईन सुविधा बंद ठेवली तर २२ ते २५ हजार रुग्णांची व्यवस्था कशी करणार, असा सवाल केला जात आहे.
.........