जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग मशीन सव्वा वर्ष बंद

By Admin | Updated: February 11, 2016 02:44 IST2016-02-11T02:44:24+5:302016-02-11T02:44:24+5:30

खासगीकरणाच्या वादात क्ष किरण विभाग अडकल्याने एक्स रे मशीन अडगळीत असतानाच विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील सव्वा कोटीचे स्कॅनिंग मशीन दुरुस्तीअभावी

The year closed for the year of scanning machine in the district hospital | जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग मशीन सव्वा वर्ष बंद

जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग मशीन सव्वा वर्ष बंद

- जितेंद्र कालेकर,  ठाणे
खासगीकरणाच्या वादात क्ष किरण विभाग अडकल्याने एक्स रे मशीन अडगळीत असतानाच विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील सव्वा कोटीचे स्कॅनिंग मशीन दुरुस्तीअभावी अक्षरश: धूळखात पडले आहे. या रुग्णालयातील सुविधा सुपरस्पेशालिटी दर्जाच्या करण्याच्या गप्पा होत असतानाच या आवश्यक सुविधाही मिळत नसल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
या रुग्णालयात नोव्हेंबर २००५ मध्ये एक कोटी ३० लाख रुपये खर्चून स्कॅनिंग मशीन बसविले. २००५ ते २०१४ या काळात या मशीनमुळे वाडा, मोखाडा, शहापूरसारख्या ग्रामीण आणि आदिवासी भागातून येणाऱ्या तसेच रेल्वे अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांना आधार मिळाला. वर्षाला साधारण तीन हजार रुग्णांचे स्कॅनिंग होत असल्याने साधारण नऊ वर्षांत ३५ हजार रुग्णांचे सिटीस्कॅन झाले. आॅक्टोबर २०१४ पासून हे यंत्र दुरुस्तीअभावी बंदच आहे. स्कॅनिंगच्या वायरिंगमध्ये बिघाड झाला असून त्यासाठी १५ ते २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या सव्वा वर्षात दुरुस्तीकडे रुग्णालयाच्या प्रशासनाने लक्षच न दिल्याने रुग्णांना एकतर ठाण्यातील महागड्या खासगी किंवा मुंबईतील सरकारी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.

एक्स रे चे खासगीकरण वादात : खासगीकरण करून पीपीपी तत्त्वावर क्ष किरण विभाग एका बड्या कंपनीला देण्यात येणार होता. यासाठी ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील एक्स रे यंत्रे उपजिल्हा रुग्णालयांना देण्यात येणार होती. त्याऐवजी विप्रोसारख्या कंपनीकडून नवी यंत्रणा बसवली जाणार होती. त्यासाठी रुग्णालयात सुमारे चार हजार चौरस फूट जागा दिल्याने पाच खोल्या रिकाम्या करण्यात आल्या. जुनी, पण चालू स्थितीतील यंत्रे काढून ठेवण्यात आली. पण, खासगीकरणाचा गाशा गुंडाळल्याने कसेबसे काम चालू आहे.

तज्ज्ञांची वानवा : स्त्रीरोग, अस्थिरोग विभाग सोडले तर इतर विभागांतील तज्ज्ञांची वानवा आहे. न्यूरॉलॉजिस्ट आणि हृदयरोग तज्ज्ञच नसल्यामुळे डोक्याला मार लागलेल्या रुग्णांना एकतर मुंबई गाठावी लागते किंवा ठाण्यातील खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागतो. शस्त्रक्रियाही माफक प्रमाणात होतात.
सोनोग्राफी विभागही हलविला : खासगीकरणासाठी जागा रिकामी करताना सोनोग्राफीचा विभागही अन्यत्र हलविला आहे. तोही अपुऱ्या जागेत सुरू आहे. सोनोग्राफी करणाऱ्या एकमेव डॉक्टर आहेत. आणखी किमान दोन सोनाग्राफीतज्ज्ञांची आवश्यकता आहे. युरोलॉजिस्टही आॅनररी आहे.
अन्य सुविधांची घोषणाच : एक्स रे, स्कॅनिंगप्रमाणेच टू डी इको, ईईजी, एमआरआय सुविधा चार वर्षांपूर्वीच सुरू होणार होत्या. पण, त्यांचा फक्त गाजावाजा झाला. रक्तपेढी सुसज्ज असली तरी तिला मिळणारे केमिकल निकृष्ट दर्जाचे असते, अशा तक्रारी आहेत.

रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जास्तीतजास्त पाठपुरावा सुरू आहे. लेबर वॉर्ड, बालरुग्ण, डोळ्यांच्या विभागाचे नूतनीकरण झाले आहे. स्कॅनिंग आणि एक्स रे यंत्रांचे काम पीपीपी तत्त्वावर खासगीकरणातून होणार होते. खासगी कंपनीला न परवडल्याने त्यांनी तपासणीचे दर वाढवून मागितले. त्या वादात काम रखडले. हा वाद आता न्यायालयात आहे. स्कॅनिंग यंत्राच्या दुरुस्तीचे आणि एक्स रे यंत्रे बसवण्यासाठी सर्र्वेक्षण सुरू आहे. काही दिवसांत ती यंत्रणा सुरू होईल. - डी.सी. केम्पी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे, जिल्हा रुग्णालय

Web Title: The year closed for the year of scanning machine in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.