शौचालयांतील शॉर्टसर्कीटच्या स्फोटात पतीचा मृत्यू पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:29 IST2019-01-16T22:27:07+5:302019-01-16T22:29:31+5:30
भिवंडी : शहरातील कल्याणरोड पाईपलाईन शेजारी असलेल्या शौचालयात चौदा दिवसांपुर्वी घडलेल्या शॉर्टसर्किटच्या घटनेत दोनजण जखमी झाले होते.त्यापैकी एकाचा मृत्यू ...

शौचालयांतील शॉर्टसर्कीटच्या स्फोटात पतीचा मृत्यू पत्नी जखमी
भिवंडी: शहरातील कल्याणरोड पाईपलाईन शेजारी असलेल्या शौचालयात चौदा दिवसांपुर्वी घडलेल्या शॉर्टसर्किटच्या घटनेत दोनजण जखमी झाले होते.त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून पोलीसांनी चौदा दिवसांनंतर आज बुधवार रोजी शौचालय ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
शहाजमाल जादेबाप शेख(५०)असे मयताचे नांव असून तो आपली पत्नी मर्जीना(४५) सोबत शौचालयांजवळ रहात होता. भिवंडी-कल्याणरोड येथील पाईपलाईन शेजारी महानगरपालिकेचे शौचालय असून हे शौचालय बीओटी तत्वावर आदर्श सामाजीक सेवा संस्था चालवित आहेत. या संस्थेने शौचालयाचे काम सांभाळण्याकरीता या दाम्पत्यास ठेवले होते. या शौचालयांत अनाधिकृतपणे वीजपुरवठा सुरू होता. हे माहित असताना २ जानेवारी १९ रोजी रात्रीच्या वेळी त्याच अवैध वीजपुरवठ्याच्या कनेक्शनवर वीजेची शेगडी लावून ते दोघे पाणी तापवित होते. तेंव्हा शार्ट सर्किटने शेगडी फूटुन स्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये शौचालयांतील पंखा जळून वाकला तर शौचालयांच्या काचा फुटल्या. याचवेळी जवळच असलेले शहा जमाल जादेबाप शेख व त्याची पत्नी मर्जीना हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर नवी मुंबई येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शहाजमाल याचा १४ जानेवारी १९ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी शौचालय ठेकेदार आदर्श सामाजीक सेवा संस्थेचे अध्यक्ष पिराजी बन्सीलाल कोमलवार (४१) याच्या विरोधात आज बुधवार रोजी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीसांनी त्यास आद्याप अटक केलेली नाही. या घटनेप्रकरणी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने व टोरेंन्ट पॉवर कंपनीने कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.