उल्हासनगरात जागतिक महिला महोत्सव संपन्न, कॅन्सर अवेअरनेस थीमने वेधले लक्ष
By सदानंद नाईक | Updated: March 17, 2026 19:08 IST2026-03-17T19:08:29+5:302026-03-17T19:08:51+5:30
Ulhasnagar News: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रं-१८ च्या नगरसेविका अंजली साळवे यांच्या वतीने १४ आणि १५ मार्च रोजी महिला महोत्सवाचे आयोजित केले होते. कॅन्सर अवेअरनेस या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या महोत्सवात हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

उल्हासनगरात जागतिक महिला महोत्सव संपन्न, कॅन्सर अवेअरनेस थीमने वेधले लक्ष
- सदानंद नाईक
उल्हासनगर - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रं-१८ च्या नगरसेविका अंजली साळवे यांच्या वतीने १४ आणि १५ मार्च रोजी महिला महोत्सवाचे आयोजित केले होते. कॅन्सर अवेअरनेस या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या महोत्सवात हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
उल्हासनगर पुर्व येथे झालेल्या दोन दिवसीय महिला महोत्सव कार्यक्रमात डॉ. अवंतिका फुंडे यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व महिलांना पटवून दिले, तर ॲड. उज्वला खाडे आणि प्रल्हाद जाधव यांनी अनुक्रमे कौटुंबिक हिंसाचार व सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन केले. शहरातील आशा सेविकांनी पथनाट्याद्वारे गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृती केली. महोत्सवात पिंक मॅरेथॉन, रांगोळी, पाककला, डान्स (आई-मुलगी), फॅशन शो आणि रील मेकिंग स्पर्धांचे आयोजनही केले होते. त्यामुळे महोत्सवाला वेगळीच रंगत आली होती.
महोत्सवात महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर अश्विनी कमलेश निकम, शिवसेना गटनेते अरुण आशान, स्थानिक नगरसेवक राजेश वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी १० वी व १२ वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा आणि विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. महिलांसाठी होम मिनिस्टर (पैठणी खेळ) खेळ घेण्यात आला. निशिगंधा पोतदार, पूजा भामरे व सोनाली स्थूल ह्या पैठणी विजेत्या ठरल्या. 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेते सतीश नायकोडी यांनी 'पैठणी' खेळाचे बहारदार सूत्रसंचालन केले.