आपल्याकडे १९७५ साली स्त्री-मुक्तीचा ट्रेन्ड आला. त्यानंतर स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी लेखनाला सुरुवात झाली. मात्र अलीकडच्या काळात काही मोजक्या स्त्री लेखिका सोडल्या तर परंपरांची बंधने झुगारून लेखन करणाऱ्या स्त्री लेखिकांची वानवा आहे. राजकारण, समाजजीवनातील अंतर्विरोध, जागतिकीकरणाचे वास्तव, शिक्षण क्षेत्रातील बजबजपुरी अशा विषयांवर स्त्री लेखिका अभावानेच लेखन करतात. सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या लेखिकांमध्येही क्रिएटिव्ह ऊर्जा फारशी दिसत नाही, अशी खंत व्यक्त करीत आहेत ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर... काही दशकांपूर्वी महिलांनी व्यक्त होण्याची चळवळ आली. स्त्रिया व्यक्त होऊ लागल्या. त्यावर भरपूर चर्चा झाली. स्त्रियांच्या एकूणच लेखनाबद्दल काय सांगाल?जेव्हापासून स्त्रिया मराठी साहित्यलेखन करू लागल्या त्या काळापासूनची चांगली परंपरा आहे. तेव्हा जरी स्त्री लेखिकांची संख्या कमी असली तरी त्यांचे लिखाण हे लक्षवेधी ठरलेले आहे. सिग्निफिकंट असे त्यांचे लेखन होते. साधारण १९७५ नंतर स्त्री मुक्तीचा ट्रेंड आला. त्यानंतरच्या साहित्यिकांच्या लेखनात लेखनाचा तीक्ष्ण अविष्कार आपल्याला दिसतो. काही तरी वेगळं लिहिण्याचा त्या प्रयत्न करतात. मात्र आताच्या साहित्यिकांबद्दल समकालीन समीक्षक फारसे लिहिताना दिसत नाही. त्यांची दखल हे समीक्षक घेत नाहीत. आताच्या काळातही काही प्रज्ञा पवार, कविता महाजन यांच्यासारख्या साहित्यिका धारदार, कधी सूक्ष्मपणे मात्र स्पष्ट आणि रोखठोक विधाने करतात. मात्र त्यांच्याबद्दल का लिहित नाही हाच प्रश्न आहे. एकतर समीक्षकांचा अभाव असावा किंवा समीक्षक हेही आवडीनिवडीवरच समीक्षा करतात. मूळातच हल्ली समीक्षा करताना आपल्या ग्रुपमधल्या लोकांच्या साहित्यावरच समीक्षा केली जाते. आपल्या आवडत्या लेखकांबद्दलच लिहिले जाते. मराठी साहित्य क्षेत्रात सध्या असे गुळमुळीत वातावरण पाहायला मिळते आहे.स्त्रिया खरोखरच मनमोकळेपणे व्यक्त होतात का की अजूनही समाज, परंपरा यांची बंधन आहेत?साहित्य क्षेत्रात काही स्त्रिया आहेत ज्या खरोखरचं मनमोकळेपणाने व्यक्त होतात. त्यांचे अनुकरण करून इतरही काही स्त्रिया लिहित्या झाल्या आहेत. मात्र आजही मोठ्या संख्येने स्त्री साहित्यिकांनी लेखनात स्वत:वर परंपरांची, समाजाची बंधन लादून घेतलेली आहेत. एखादे मत मांडताना, विधान करताना हे परंपरेला धरून आहे ना किंवा एखादे मत हे समाजाच्याविरोधात जाणार नाही ना याचा विचार करतात. प्रज्ञा पवार, नीरजा या काही साहित्यिका आहेत ज्या कोणतीही बंधने न मानता आपले लेखन करतात. स्त्रीवादी साहित्य हेच स्त्रियांचे साहित्य अशी काहीशी मांडणी होतेय का? स्त्रीवादी साहित्य हेच स्त्रियांचे साहित्य असे काही ठरवून दिलेले नाही. परंतु साधारण सन १९८० पासून पुढच्या कवयित्री या स्त्रीवादाने प्रभावित आहेत. मूळात स्त्रीवादी साहित्य लिहिणे हा आजचा ट्रेंड आहे. स्त्रीवादी लेखन हे प्रभावी असल्याने अनेक स्त्री साहित्यिकांकडून स्त्रीवादी व अनुकरणात्मक स्त्रीवादी साहित्यच लिहिले गेले आहे. अस्तित्ववादी जाणीवा, समाजजीवन, मानवी मनाबद्दल स्त्री साहित्यिकांनी लिहिले पाहिेजे. मात्र स्त्रीवादी साहित्यच लिहिले जात असल्याने तसेच काहीसे त्यांच्याकडे पाहिले जाते.कोणते नवीन प्रकार स्त्री साहित्यात आढळून आलेत का? नसतील तर का?एखाददुसरा अपवाद वगळता कोणतेच नवीन प्रकार स्त्रीवादी साहित्यात पाहायला मिळत नाही. कविता महाजन, शिल्पा कांबळे, वंदना भागवत या काही मोजक्या साहित्यिकांच्या लेखनप्रकारात अविष्काराची वेगळी पद्घत पाहायला मिळते. वेगळ्या अनुभवाचे दोरे या साहित्यिका हाताळताना दिसतात. वेगळे विषय, वेगळ्या अनुभवांवर लिहिणाऱ्या साहित्यिका या अपवादात्मक आहेत. मूळात अनुभव कमी पडत असल्याने त्याचा परिणाम लेखनावर होतो आहे.परदेशी लेखनात स्त्रिया तुलनेने अधिक मोकळेपणाने लिहितात हा भाषेचा प्रभाव की वातावरणाचा?आपल्यापेक्षा परदेशी लेखनात स्त्रिया तुलनेने अधिक मोकळेपणाने, बिनधास्त होऊन लिहितात हा तेथील वातावरणाचा प्रभाव आहे. मात्र शब्दही कधीकधी साहित्य लेखनात परिणामकारक ठरतात. काही शब्द आपण इंग्रजीत सहज बोलतो तसं मराठीत होत नाही. काही शब्द अजूनही मराठीत रूढ झालेले नाही. त्याचा परिणाम साहित्यावर होतो.स्त्रियांच्या लिखाणाकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत?भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रातील आपण स्त्रिया अतिशय चाकोरीबद्ध जीवन जगतो. त्यामुळे आपल्याला अनुभवाचे वेगवेगळे प्रदेश धुंडाळता येत नाही. परिणामी आपल्या लेखनावर मर्यादा पडते. मराठी साहित्यातील स्त्री साहित्यिका या अतिशय चाकोरीबद्ध लिहितात. नवनवीन चॅलेंजेस् त्या स्वीकारत नाहीत. आशय काय असावा यावर त्यांचा भर असतो. मात्र तो वेगवेगळ्या पद्धतीने कसा मांडता येईल त्याचा प्रयत्न करीत नाहीत. प्रयोगशीलता त्यांच्यामध्ये दिसत नाही. ग्रामीण जीवन, राजकारण, समाज जीवनातील अंतर्विरोध या विषयांवर स्त्री साहित्यिकांचे साहित्य दिसत नाही. या प्रकारातही त्यांना खूप आणि विविध प्रकारे लिहिता येईल. गेल्या काही वर्षात जागतिकीकरणाचे वास्तव यावर खूप चर्चा होते. मात्र या वास्तवाने अस्वस्थ होऊनही स्त्रिया लेखन करताना दिसत नाहीत. अनेक स्त्रिया शिक्षण क्षेत्रात काम करतात. पण त्यातील बजबजपुरी, शिक्षण क्षेत्रातील घसरणारी मूल्ये यावर लेखन करताना कोणी दिसत नाही. खरं म्हणजे अस्वस्थ होऊन लिहिण्यासारखे खूप विषय देशात आहेत. पण विशेषत: मराठी साहित्य क्षेत्रातील स्त्री साहित्यिका त्यावर लेखन करत नाहीत. ते करण्याची गरज आहे, असे वाटते.सोशल मीडियामुळे व्यक्त होणे स्त्रियांना तुलनेने सोपे जाते आहे का?स्त्री साहित्यिका सोशल मीडियावर लिहित असतील पण त्यात क्रिएटीव्ह उर्जा फारशी दिसत नाही. त्यावरील कविता म्हणजे फक्त मनात आलं की ते भरभरं लिहिलं आणि पाठवलं असे असते, अस मला वाटते. मात्र तरीही स्त्री साहित्यिकांना मी त्यावर फार व्यक्त होताना पाहिलेलं नाही. मुलाखतकार : स्नेहा पावसकर
अस्वस्थ करणाऱ्या विषयांवर स्त्रियांनी लिहावे...
By admin | Updated: February 1, 2017 03:12 IST