ठाणे: वधू वर सूचक संकेतस्थळावरुन एका ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून सव्वा लाख रुपये उकळणा-या इसिदाहोमेन ख्रिस्टीयन (२३) या नायजेरियन भामटयाला ठाणे पोलिसांनी थेट दिल्ली येथून बुधवारी अटक केली आहे. त्याला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचेआदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या पोखरण रोड क्रमांक एक येथे राहणा-या या महिलेची इसिदाहोमेन याने जैन मॅट्रोमेनी या वधू वर सूचक संकेतस्थळावरुन माहिती काढली. त्यानंतर त्याने आपणही चांगल्या ठिकाणी नोकरीवर असल्याचे सांगून तिला लग्नाची मागणी घातली. एक चांगले स्थळ आल्याचा समज झाल्याने या महिलेनेही त्याला तशी संमती दिली. पण, आधी चांगली ओळख होण्यासाठी ती त्याच्याशी फोन आणि नेटच्या माध्यमातून संपर्कात आली. तिच्याशी चांगल्या प्रकारे मैत्रि केल्यानंतर त्याने तिचा विश्वास संपादन केला. हीच संधी साधून त्याने तिला एक गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगितले. हे गिफ्ट पार्सलने पाठवायचे असल्यामुळे उत्पादन शुल्क भरावे लागेल असे सांगून गिफ्टमध्ये पाऊंडच्या स्वरुपात ब्रिटीश चलन पाठवित असल्याचेही त्याने सांगितले. त्याच नावाखाली त्याने सप्टेंबर ते ३० आॅक्टोंबर २०१७ या कालावधतीत तिच्याकडून आॅनलाईन बँकींगमार्फत एक लाख २७ हजार ८९९ रुपये इतकी रक्कम घेतली. अर्थात, इतके पैसे घेऊनही तिला कोणत्याही प्रकारचे पार्सल किंवा त्याच्याकडून परकीय चलनही त्याने पाठविले नाही. शिवाय, तिचे पैसे मिळाल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्कही तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एस. बी. सावंत, पोलीस नाईक विजय सोनवणे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच खब-यांच्या मदतीने त्याची पूर्ण माहिती काढली. त्याची पत्नी अरुणा अवमी हिच्याकडील चौकशीतून त्याला दिल्लीच्या पालम येथील महावीर एन्क्लेव येथून ६ डिसेंबर रोजी अटक केली. त्याच्या अटकेबाबत नायजेरियन दूतावासालाही माहिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याने आणखी अशा किती महिलांना फसविले, तसेच किती रुपयांची फसवणूक केली, यात त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत, या सर्व बाबींचा वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास हट्टेकर हे अधिक तपास करीत आहेत......................
लग्नाच्या अमिषाने ठाण्यातील महिलेची सव्वा लाखांची फसवणूक: दिल्लीतून नायजेरियनला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:58 IST
लग्नाच्या अमिषाने ठाण्यातील महिलेकडून सव्वा लाखांची रक्कम उकळणा-या नायझेरियनला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याने अशा अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लग्नाच्या अमिषाने ठाण्यातील महिलेची सव्वा लाखांची फसवणूक: दिल्लीतून नायजेरियनला अटक
ठळक मुद्देवधू वर सूचक संकेतस्थळावरुन काढली महिलेची माहितीठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलची कारवाईअनेक महिलांना गंडा घातल्याची शक्यता