A woman arrested for cheating case by Thane crime branch | मुंबई महापालिकेत नोकरीस लावण्याच्या नावाखाली साडेतीन लाखांचा गंडा घालणाऱ्या महिलेस अटक

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई गेल्या आठ महिन्यांपासून ती हुलकावणी देत होतीमनसेनेही केली होती कारवाईची मागणी

ठाणे : मुंबई महापालिकेमध्ये नोकरीला लावण्याच्या नावाखाली सहा ते सात तरुणांकडून सुमारे साडेतीन लाखांची रक्कम उकळणा-या निकिता सावंत या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी ठाण्यातील पाचपाखाडी भागातून अटक केली. तिला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करणा-या धीरज चव्हाण (३०) यांची डिसेंबर २०१८ मध्ये निकिता हिच्याशी ओळख झाली होती. तिने मुंबई महापालिकेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचा दावा चव्हाण यांचे सहकारी मनोज पुजारी यांच्याकडे केला होता. त्याआधारावर मनोज यांनी डिसेंबर २०१८ मध्ये निकिताला ५३ हजार रुपये नोकरीला लावण्यासाठी दिले. त्यानंतर, सुब्रह्मण्यम नाईकर, सेंथलीकुमार नाईकर, विशाल वाल्मीकी यांच्यासह मानपाडा येथील आरती कांबळे या भाजीविक्रेत्या महिलेकडूनही तिने ५० हजारांची रक्कम घेतली. मे २०१९ नंतर मात्र तिने यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधला नाही. अखेर, चव्हाण यांंच्यासह सात जणांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात २१ जानेवारी रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. निकिता ही पाचपाखाडी भागात एका खासगी कामासाठी येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २४ जानेवारी रोजी दुपारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस हवालदार नितीन ओवळेकर, पोलीस नाईक प्रेरणा जगताप आणि हेमंत महाले यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिने यापूर्वीही मुंबईत अशाच प्रकारे फसवणुकीचे प्रकार केल्यामुळे तिच्याविरुद्ध कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झालेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मनसेनेही केली होती कारवाईची मागणी
सावंत या महिलेने अनेक बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याच्या तक्रारी आल्यानंतर महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपायुक्तांकडे यासंदर्भात कारवाईची तक्रार केली होती. त्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अखेर या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केल्याने मनसेने या कारवाईबद्दल आभार पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

Web Title: A woman arrested for cheating case by Thane crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.