मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 07:16 PM2021-10-19T19:16:27+5:302021-10-19T19:16:38+5:30

७ ऑक्टोबर पासून शटडाऊन ने सुरू झालेल्या तांत्रिक कारणांनी एमआयडीसी चा पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणी समस्या तीव्र झाली होती.

Withdraw agitation for water in Mira Bhayandar; Municipal Commissioner's request to political leaders | मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती

मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती

Next

मीरा-भाईंदरमधील पाण्यासाठीची आंदोलने मागे घ्या; महापालिका आयुक्तांची राजकीय नेत्यांना विनंती मीरा रोड - मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी कडून शटडाऊन व नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटणे व अंबरनाथ येथे जलवाहिनी फुटण्याच्या पाठोपाठ घडलेल्या तांत्रिक कारणांनी विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत होत असल्याने पाण्यासाठीची आंदोलने करू नका अशी विनंती महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी राजकीय नेत्यांना लेखी पत्राद्वारे केली आहे . 

७ ऑक्टोबर पासून शटडाऊन ने सुरू झालेल्या तांत्रिक कारणांनी एमआयडीसी चा पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणी समस्या तीव्र झाली होती. लोकांचे ऐन सणासुदीत पाण्या वाचून हाल झाले. लोक संतप्त झाले होते. आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना स्वतंत्र भेटून पाणी समस्या सोडवण्यासाठी निवेदने दिली. 

दुसरीकडे पाणी पुरवठा सुरळीत व्हायला लागला असताना मनसेने १८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी १६ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले. शिवसेनेने १८ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले व पुन्हा २० ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्या आधी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपाच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी सिल्वरपार्क ते चेकनाका अशी पदफेरी व नंतर अंधेरीच्या एमआयडीसी कार्यालया बाहेर आंदोलन जाहीर केले आहे.

पाणी समस्येला राज्य सरकार व शिवसेना जबाबदार असल्याचा मेहतांचा रोख आहे.   पाणी समस्ये वरून राजकारणी आरोप - प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे पाण्यावरून राजकारण तापले आहे. एमआयडीसी व स्टेमच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांनी बैठक घेतली.  त्या अनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले आंदोलने करू नका म्हणून विनंती करत आ. सरनाईक, माजी आ. मेहता आदींना लेखी पत्र देऊन बाजू मांडली आहे. 

नेत्यांना दिलेल्या लेखी निवेदनात आयुक्त म्हणतात की, मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून  ८६ दशलक्ष तर एमआयडीसीकडून १२५ दशलक्ष असे एकूण २११ दशलक्ष पाणी मंजूर आहे .परंतु एमआयडीसी कडून रोज साधारण ११० दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा केला जातो. तर स्टेम कडूनही मंजूर कोट्या नुसार पूर्ण पाणी मिळत नाही. त्यामुळे रोज सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. तर सध्याच्या लोकसंख्ये नुसार २१५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. 

गुरुवार ७ ऑक्टोबर मध्यरात्री ते शुक्रवारी ८ रोजीच्या मध्यरात्री असा २४ तासांचा दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आला होता. शनिवारी ९ रोजी पहाटे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. तोच शिळफाटा येथील देसाई गाव ते खिडकाळेश्वर मंदिर पर्यंतची जुनी जीर्ण जलवाहिनी काढून ५.५ किमीची नवीन जलवाहिनी  टाकण्याचे काम पूर्ण केले असताना त्यातील १.२ किमी चा भाग जोडताना दोन वाय तुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाला. 

१० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. अंबरनाथ , जांभुळगाव येथे मुख्य १८०० मिमी ची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणी पुरवठा खंडित झाला. दुरुस्ती काम ११ रोजी मध्यरात्री १.३० वा पूर्ण झाले. व सकाळी ६ वाजता शहराचा पाणी पुरवठा सुरू झाला.  असा सलग ७६ तास पुरवठा बंद होता. शिळफाटा ते कटई दरम्यान जुनी जलवाहिनी सारखी फुटते म्हणून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्टेम व एमआयडीसी कडून मंजूर पाणी कोटा मिळावा म्हणून कार्यवाही सुरू आहे. 

सुर्या धरणातून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. ९८ किमीची जलवाहिनीचे काम सुरू आहे. चेणे येथे वन खात्याच्या जमिनीत ४८ दशलक्ष लिटर ची संतुलन टाकी चे काम सुरू होणार आहे. एमएमआरडीए tith पर्यंत सूर्याचे पाणी आणून देणार आहे. तिकडून शहर अंतर्गत  वितरण व्यवस्थेचे जलवाहिन्यांचे जाळे महापालिकेला अंथरावे लागणार आहे. ती योजना पूर्ण झाल्यावर शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. 

आयोजित आंदोलने मागे घेऊन महापालिकेला सहकार्य करण्याची विनंती आयुक्तांनी लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना केली आहे. पत्राची प्रत आयुक्तांनी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्तांना देखील दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा आता सुरळीत होत असताना वराती मागून आंदोलनाचे राजकीय घोडे नाचवणे तूर्तास थांबेल की नाही ? या कडे लक्ष लागले आहे. 

Web Title: Withdraw agitation for water in Mira Bhayandar; Municipal Commissioner's request to political leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.