लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ‘साठी बुद्धी नाठी’ ही खा. नरेश म्हस्के यांची टीका भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या जनता दरबाराचे ठिकाण बदलून ठाण्यातील मध्यवर्ती भागातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये येत्या शुक्रवारी दरबाराचे आयोजन केले आहे. यापूर्वी शिंदेसेना व नाईक यांच्यात जनता दरबारावरून खडाजंगी झाली होती. ठाणे महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने आयोजित केलेल्या या जनता दरबारामुळे दहीहंडीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी टेंभीनाक्याला एकत्र येऊन दिलेल्या एकोप्याच्या संदेशावर बोळा फिरण्याची चर्चा सुरू आहे.
महापालिका निवडणुकीत स्वबळाची लागली आस
शिंदेसेनेच्या नेत्यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना नाईक यांनी ठाणे हे सर्वांचेच असल्याचे सांगत शहरातील अडचणी सोडविण्यासाठी गरज पडली तर, अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असे ठणकावून सांगितले. नाईकांच्या विधानानंतर भाजप विरुद्ध शिंदेसेना सामना तीव्र झाला. पालघरच्या कार्यक्रमात नाईक यांनी शिंदे यांना लॉटरी लागली; पण मिळालेले टिकवता यायला हवे, असे विधान केले. त्याचा समाचार घेताना खा. म्हस्के यांनी घेतला. गेले काही दिवस मुख्यमंत्री फडणवीस व शिंदे यांच्यातील बेबनावाची वृत्ते येताना दहीहंडीच्या दिवशी टेंभीनाका येथील उत्सवात हे दोघे एकत्र आले व त्यांनी एकोप्याची ग्वाही दिली. मात्र ठाण्यातील भाजपमधील नाईक यांच्यासह नेत्यांना व शिंदेसेनेतीलही काही नेत्यांना महापालिका निवडणुकीत स्वबळाची आस लागलेली आहे, असे चित्र आहे.