मीरा भाईंदरमध्ये युतीचं गणित बिघडणार? शिंदेसेनेचा ५० टक्के जागांवर दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:14 IST2025-12-20T13:12:12+5:302025-12-20T13:14:34+5:30
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीमध्ये शिंदेसेनेला ५० टक्के जागा हव्यात, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.

मीरा भाईंदरमध्ये युतीचं गणित बिघडणार? शिंदेसेनेचा ५० टक्के जागांवर दावा!
मीरा रोड : २०१७ च्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आता मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीमध्ये शिंदेसेनेला ५० टक्के जागा हव्यात, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडत शिवसेनेची ताकद ही वाढलेली असून, शनिवारच्या निर्धार मेळाव्यात ती ताकद दाखवून देऊ, असे सांगितले.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी ९५ पैकी ६५ जागा स्वतः आणि शिंदेसेनेला १७ जागा देण्यासह उर्वरित १३ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला दिला आहे. तर दुसरीकडे त्यापूर्वी शिंदेसेनेचे मंत्री सरनाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमची युतीची इच्छा आहे; परंतु, भाजपच्या स्थानिक नेत्याची युती करायची इच्छा नाही. पण, धोका नको म्हणून सर्व ९५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार तयार असून, मुलाखती सुरू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना २०१७ आणि आताच्या स्थितीत फरक असल्याचे आपण निदर्शनास आणून दिले आहे. त्यावेळीदेखील शिवसेनेचे ८ ते १० उमेदवार हे १० ते २०० मतांनी हरले होते, असे सरनाईक म्हणाले.
ताकद दाखवून देऊ
"मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी १८०० कोटींचा निधी दिला. शहरात मेट्रो प्रकल्प झाला, आपण मेट्रोखाली तीन उड्डाणपूल करून घेतले व इतर अनेक विकासकामांची माहिती त्यांनी दिली. काहींना वाटते की शिवसेनेची मीरा भाईंदरमध्ये ताकद नाही; मात्र, त्यांना दाखवून देऊ की शिवसेनेची ताकद किती आहे."
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, शिंदेसेना