पुन्हा कलानी जिंकणार की, आयलानी बाजी मारणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 00:24 IST2019-10-17T00:24:21+5:302019-10-17T00:24:37+5:30
सदानंद नाईक। लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी व राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती ...

पुन्हा कलानी जिंकणार की, आयलानी बाजी मारणार?
सदानंद नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी व राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्यात थेट लढत आहे. मोदीलाटेत ज्योती कलानी यांनी आयलानी यांचा गेल्यावेळी अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता. यावेळी एकूण १८ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत आयलानी व कलानी यांच्यात आहे.
महापालिकेत भाजप-ओमी कलानी यांच्या आघाडीची सत्ता असून पंचम कलानी महापौर आहेत. कलानी कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या चिन्हावर रिंगणात उतरल्या आहेत. धोकादायक इमारती, बंद पडलेला जीन्स उद्योग, अर्धवट विकासकामे, ३०० कोटींची योजना राबवूनही पाणीटंचाई, डम्पिंगचा प्रश्न, पालिकेतील भोंगळ कारभार आदींमुळे शहर भकास झाले. ओमी कलानी टीमची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, भाजपने कलानी कुटुंबाला दूर सारल्याची चर्चा आहे. तरीही, कलानी कुटुंबाविषयी आकर्षण आहे. त्यामुळे येथील लढत निश्चितच अटीतटीची होणार आहे.
जमेच्या बाजू
शहरात पप्पू कलानी यांना मानणारा विशिष्ट वर्ग असून कलानी कुटुंबाचे आकर्षण कायम आहे. त्यांच्या काळातील काँक्रिटचे रस्ते आजही चांगल्या अवस्थेत आहेत. धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी चार चटईक्षेत्र मिळवून दिले. भुयारी गटारे, खेमानी नाला योजना कार्यान्वित तसेच सिंधी भवनला चालना, तर चालिया व झुलेलाल मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. गुन्हेगारीबाबत आवाज उठवला आहे.
कुमार आयलानी यांचे चारित्र्य स्वच्छ असल्याने त्यांच्याबद्दल शहरात कुतूहल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचा माणूस म्हणून ओळख आहे. त्यांची पत्नी मीना आयलानी महापौर असताना ३२० कोटींच्या निधीतून विविध विकासकामे व रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून होत आहे. मागील निवडणुकीत १८५० मतांनी पराभव झाला, तरी त्यापूर्वी पप्पू कलानी यांचा पराभव आयलानी यांनी केला होता.
उणे बाजू
गुन्हेगारी व रक्तरंजित राजकारणाचा ठपका कलानी कुटुंबावर बसला आहे. ज्योती कलानी निवडक समर्थकांसह राष्ट्रवादीत, तर मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीम स्थापन करून भाजपसोबत महापालिका सत्तेत आहेत. पंचम कलानी भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून येऊन महापौर आहेत. ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांवरच गोळीबार, अपहरण, बलात्कार, हाणामारी आदी गुन्हे दाखल आहेत.
\कुमार आयलानी हे राजकारणी कमी, तर व्यापारी जास्त असल्याची टीका होते. त्यांच्यावरही एका हत्येचा गुन्हा असून तो न्यायप्रविष्ट आहे. निवडणुकीदरम्यान भूमाफिया व तडीपार झालेल्यांना पक्षप्रवेश दिल्याने वादात सापडले. आयलानी हे कलानींपेक्षा कमी नाहीत, असा आरोप होत आहे. वादग्रस्त व मोठ्या गृहसंकुलांच्या बांधकाम व्यावसायिकांची जवळीक, कबरस्तान रद्द केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.