शेतीची कामे करणार रोजगार हमी योजनेतून; शेतकऱ्यांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:37 AM2020-12-02T01:37:22+5:302020-12-02T01:37:35+5:30

अवकाळी पावसामुळे कापून पडलेला भात शेतातच ओला झाला. एवढेच काय तर भाताला कोम येऊन हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

Will do agricultural work through employment guarantee scheme; Work in the hands of farmers | शेतीची कामे करणार रोजगार हमी योजनेतून; शेतकऱ्यांच्या हाताला काम

शेतीची कामे करणार रोजगार हमी योजनेतून; शेतकऱ्यांच्या हाताला काम

Next

ठाणे : यंदा ओल्या दुष्काळाची स्थिती उद्भवून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासह त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी यंदा शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजना म्हणजेच एमआरईजीएसद्वारे करण्याचा ठराव ठाणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत घेतला आहे. या निर्णयामुळे ऐन संकटकाळात शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळून त्यांना भरिव मदत होणार आहे.

अवकाळी पावसामुळे कापून पडलेला भात शेतातच ओला झाला. एवढेच काय तर भाताला कोम येऊन हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या बिकट स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या भूमिकेतून त्यांच्या शेतातील काम एमआरईजीएसद्वारे करून त्यास या कामाची मजुरी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुभाष घरत या ठरावासाठी आग्रही होते. याबाबत लेखी निवेदनही त्यांनी आधीच अध्यक्षांना देऊन हा विषय सभागृहात मांडला. त्यास सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी सहमती देत एकमताने ठराव घेण्यात आला.

अवकाळी पावसाने शेताचे बांध तुटले, फुटले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसह शेत जमिनीचे सपाटीकरण, फळलागवड, बांधावरील वृक्ष लागवड आदी विविध कामे शेतकऱ्यांना स्वत: करावी लागतात. त्यासाठी मोठी आर्थिक झळ शेतकऱ्यांना नेहमीच सोसावी लागते. जिल्हा परिषदेच्या निर्णयामुळे त्यातून त्यांची सुटका तर होणारच आहे, याशिवाय  शेतीची कामे रोजगार हमी योजनेतून केली जाणार असल्याने या कामाची मजुरीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकप्रकारे दुहेरी लाभ मिळणार आहे.

वर्षभर मिळवून देणार काम
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतीसंबंधी विविध कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. याशिवाय शौचखड्डे, साफसफाईची कामे, गाव स्वच्छता आदी कामे जिल्हा परिषद आता प्राधान्याने घेऊन शेतकऱ्यांसह गावपाड्यांतील मजुरांच्या हाताला वर्षभर काम मिळवून देणार आहे.

Web Title: Will do agricultural work through employment guarantee scheme; Work in the hands of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी