आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल
By नितीन पंडित | Updated: February 4, 2024 19:10 IST2024-02-04T19:09:20+5:302024-02-04T19:10:12+5:30
भाजपा महाराष्ट्राला बिहराच्या वाटेवर घेवून चालली आहे, एमआयएमचे डॉ अब्दुल कादरी यांचे राज्य सरकारवर ताशेरे

आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: राज्यात कायदा सुव्यवस्थेचे ठेकेदार असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला बिहारच्या वाटेवर घेऊन निघाले आहेत. मीरा भाईंदर येथील गरीब मुस्लिम समाजावर बुलडोझर चालवणारे, पोलिस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराच्या घरावर बुलडोझर चालवणार का? असा सवाल एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी यांनी केला आहे.
रविवारी ते भिवंडीत लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.याप्रसंगी भिवंडी शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी, अकरम खान,डॉ.बिलाल अंसारी,अँड. अमोल कांबळे,फरीद खान,अनीस शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा गोळीबार करणाऱ्या गायकवाड याला ही क्लिनचीट देतील जशी अजित पवार यांना भाजपाने दिली.जसे मिरा भाईंदर येथील गरीब मुस्लिम बांधवांच्या घरांवर बुलडोझर चालवला तसा आमदार गायकवाड यांच्या घरावर बुलडोझर चालवून दाखवावा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे .
महाराष्ट्रात पाच जागा लढवणार ?
महाराष्ट्रात एम आय एम पक्ष उत्तरमध्य मुंबई, धुळे मालेगाव,नांदेड ,भिवंडी व संभाजी नगर या पाच लोकसभा जागा लढवण्याचा विचार करीत असून त्या दृष्टीने मतदारसंघाचे सर्वेक्षण सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून वंचित दलीत अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी भाजपला पराभूत करण्याचा इरादा एमआयएम पक्षाचा आहे.परंतु धर्मनिरपेक्ष मतांचे ठेकेदार समजणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे एम आय एम पक्षाला अछूत समजत असल्याने इंडिया आघाडीने एम आय एम पक्षाला आमंत्रित केले नाही.परंतु त्यांच्या मध्ये सुध्दा काही आलबेल नाही इंडिया आघाडीचा सर्वात मोठा ठेकेदार नितीशकुमार फरार झाले आहेत अशी घणाघाती टीका देखील यावेळी डॉ अब्दुल गफार कादरी यांनी केली आहे.