ठाण्यातील ‘सिंघम’वर आता ही बारी का आली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:31 AM2020-03-09T00:31:40+5:302020-03-09T00:31:58+5:30

ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल हे धडाडीचे अधिकारी, ठाण्याचे सिंघम अशी त्यांनी त्यांच्या कामांतून आपली ओळख निर्माण केली. मात्र, अखेर त्यांचा ठाण्यातील नगरसेवक व अधिकारी यांच्याशी संघर्ष विकोपाला गेल्याने त्यांना सुटी घेऊन ध्यानधारणेकरिता जावे लागले. ठाणेकरांना एक कर्तबगार अधिकारी पाच वर्षे अनुभवायला मिळाला. त्याची अशी शोकांतिका का झाली?

Why is this turn on 'Singham' in Thane? | ठाण्यातील ‘सिंघम’वर आता ही बारी का आली?

ठाण्यातील ‘सिंघम’वर आता ही बारी का आली?

Next

अजित मांडके, ठाणे


पाच वर्षे दोन महिने ठाण्याची सेवा केल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाण्याला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे ठाणेकर हळहळ व्यक्त करीत आहेत. त्यांनी भावनेच्या भरात तर हा निर्णय घेतलेला नाही ना? अशी चर्चा सुरू आहे. जयस्वाल यांनी पाच वर्षांत ठाण्यासाठी अनेक विकासकामे केली. अनेक नवीन प्रकल्प त्यांनी ठाण्यात आणले. कोणतेही वाद न होता, केलेल्या रस्ते रुंदीकरणासह अगदी ठाणेकरांच्या मनात सिंघम म्हणूनही त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्याच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीची अशा पद्धतीने एक्झिट होणे, हे खटकणारे आहे. पाच वर्षे ठाण्यातील ज्या नगरसेवकांनी जयस्वाल यांना पाठिंबा दिला, त्यांना कायम आयुक्तपदी ठेवण्याचे ठराव केले, तेच त्यांच्याविरोधात का गेले, याचे आत्मपरीक्षण जयस्वाल यांनीही करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या जयस्वाल जवळचे होते. परंतु, आता त्यांनी अचानक त्यांच्याकडे पाठ का फिरवली, असा सवाल निर्माण झाला आहे.

आपण ध्यानधारणेकरिता सुटीवर जात असल्याचे जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ध्यानधारणा ही उत्तम गोष्ट आहे. यामुळे मन:शांती लाभते, त्याचबरोबर आत्मपरीक्षण करता येते. शासकीय सेवेत धडाकेबाज कामगिरी करणाºया या अधिकाºयावर ही वेळ येणे, ही चांगली गोष्ट नाही. जयस्वाल यांनी केलेली काही कामे ठाणेकरांनी उचलून धरली. अर्थात, काहींचे त्यांच्याशी जराही पटले नाही. त्यामुळे काही जण जयस्वाल कधी संकटात सापडतात, या संधीची वाट पाहत होते. एकाचवेळी अनेकांना दुखावण्याची चूक जयस्वाल यांनी केली नसती, तर कदाचित ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली नसती.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कोलकाता येथील सेंट पॉल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली. पुढील उच्च शिक्षण हे सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी भारतीय प्रशासन सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली. १९९७-९८ मध्ये त्यांची नाशिकच्या सहायक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. १९९८ ते २००० या कालावधीत त्यांनी नंदुरबार येथेही सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. नाशिक जिल्ह्याचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते. मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. १२ जानेवारी २०१५ रोजी ते आयुक्त म्हणून ठाणे महापालिकेच्या सेवेत रुजू झाले. त्यावेळेस पालिकेची आर्थिक स्थिती अगदीच बेताची होती. ठाणे महापालिका डबघाईला आली होती. प्रशासनाची घडी विस्कटलेली होती आणि अधिकाऱ्यांची मानसिकता खचलेली होती. प्रशासनावरील वाढणारा राजकीय दबाव, अनधिकृत बांधकामांचे वाढते पेव, शहराचा रखडलेला विकास आदी समस्यांतून मार्ग काढून ठाणे शहराला स्मार्ट करण्याच्या दृष्टीने जयस्वाल यांनी प्रयत्न केले. पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अनेक अशक्यप्राय गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या आहेत. रस्ता रुंदीकरणाचाच विषय घेतला, तर कोणत्याही ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला नाही. सर्व्हिस रस्ते, हगणदारीमुक्त ठाणे, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, कचºयावर प्रक्रिया करून विविध प्रयोग, तब्बल ५०० कोटींचे रस्ते आणि २०० कोटींची नाले दुरुस्तीची कामे एकाच वेळी करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्यामुळे भविष्यातील ठाणे हे स्मार्ट, सुंदर आणि हायटेक असणार, असा विश्वास त्यांनी निर्माण केला.

ठाण्याचा विकास करण्यावर अधिक भर दिला. उत्पन्न वाढवत असतानाच त्यांनी स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने रस्ते रुंदीकरणाची मोहीम घेतली. यामध्ये बाधितांना तत्काळ घरे देण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा आता असा झाला आहे की, ठाणेकरांची वाहतूककोंडीतून मुक्तता झाली आहे. त्यानंतर लागलीच शहरातील अनधिकृत बारवर कारवाईचा सपाटा, घोडबंदरचा सर्व्हिस रोड, शास्त्रीनगर हत्तीपूल, बाळकुम, मुंब्रा, कळवा आदींसह सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्टेशन ते जांभळीनाका रस्त्याचे रुंदीकरण करून त्यांनी ठाणेकरांची शाबासकी मिळवून सिंघम ही उपाधीही मिळविली. सॅटिस परिसर फेरीवालामुक्त केला.

मालमत्ताकरावरील १०० टक्के प्रशासकीय आकार माफ केला. अनधिकृत होर्डिंग, बॅनरवर कारवाईचा धडाका, दोन वर्षांत पाच लाख वृक्षलागवडीचा संकल्प, घोडबंदर रोड व सर्व्हिस रोडच्या आड येणाºया बांधकामांवर कारवाई, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पीपीपीचे विविध प्रकल्प, मालमत्ताकर आॅनलाइन भरणे, अनधिकृत बांधकामांत दोषी आढळलेल्या तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करणे, ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतीचे पुनर्सर्वेक्षण, धोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात, एकाच वेळेस २१ थीम पार्क निर्माण करण्याची संकल्पना, खाडी विकास प्रकल्पांतर्गत पारसिक चौपाटीचे काम अतिशय वेगाने सुरू झाले आहे. त्यापाठोपाठ घोडबंदर भागातील नागलाबंदर, वाघबीळ आदींसह अन्य दोन ठिकाणी अशा पद्धतीने चौपाटी विकसित करण्याचा धडाका त्यांनी सुरू केला. महापालिका शाळांतील मुलांसाठी ई-लर्निंगची सुविधा, रस्ते दुभाजक चकाचक, कामचुकार १४ सफाई कामगारांवर निलंबनाची कारवाई, बहुमजली पार्किंगचा निर्णय, केवळ १५ दिवसांत कचराळी तलावाचा कायापालट, क्लस्टर योजना राबविण्यातही त्यांनी महत्त्वाची पावले उचलली. याशिवाय स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आयुक्तांनी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत.

यामध्ये शहरात तब्बल १६०० सीसीटीव्ही बसवणे, वायफायची सेवा, २४ तास पाणीपुरवठा योजना, कचºयाची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून विविध कचरा प्रकल्प सुरू केले आहेत. पूर्वेकडील सॅटिसचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. अंतर्गत मेट्रोसाठी आयुक्तांनी उचललेले पाऊल, ब्रॅण्ड ठाण्याच्या माध्यमातून शहराला दिलेली एक वेगळी ओळख, दिवाळी सेलिब्रेशन असे अनेक प्रकल्प त्यांनी हाती घेतले. त्यातही अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी धडपड केली.

हे सर्व प्रकल्प राबवित असताना कधीकधी लोकप्रतिनिधी, महापौर यांच्यात झालेले वादही या शहराने पहिल्यांदाच पाहिले. परंतु, त्या वादावर पडलेला पडदाही याच ठाणे शहराने पाहिलेला आहे. अनेक चुकीच्या प्रस्तावांना झालेला विरोध आणि त्याचा सत्ताधाºयांनी धरलेला आग्रह यामुळे अनेक वादग्रस्त प्रस्तावही याच पाच वर्षांच्या कार्यकाळात मंजूर झाल्याचे दिसून आले. त्यातही जे अधिकारी असोत, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक असोत, अशा अनेकांना त्यांनी आपल्या खास शैलीतून आपलेसे केले होते, यामागे काहींचा स्वार्थ होता, तर काहींचा आणखी काही वेगळा उद्देश. जयस्वाल यांच्यात अनेक गुण असले तरी त्यांनी त्यांच्या स्वभावामुळे अनेक दुश्मन तयार केले. महासभेत केली गेलेली सार्वजनिक पातळीवरील टीकाही ते वैयक्तिक टीका म्हणून पाहत आणि लोकप्रतिनिधींवर डूख धरत प्रसारमाध्यमांमधील बोटभर टीकाही त्यांना रुचत नव्हती. प्रशासनातील काही खूशमस्कºयांनी त्यांच्याभोवती कोंडाळे केल्याने तेही त्यांचे कान भरत होते. लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचा आदर ठेवला गेलाच पाहिजे. अनेकदा लोकशाही व्यवस्थेत खुजी माणसे सत्तेच्या खुर्चीवर बसतात, हे दुर्दैवी वास्तव असले तरी तो त्यांच्या खुर्चीचा मान असतो. नोकरशहा या नात्याने आपण लोकप्रतिनिधींचा सन्मान केला पाहिजे, ही बाब जयस्वाल यांच्याकडून दुर्लक्षित झाली.

‘हम करे सो कायदा’ या खाक्याने काम करणाºया जयस्वाल यांना अखेरीस सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेरले व त्याचा फटका त्यांना बसला. भाजपप्रणीत राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक त्यांना महाविकास आघाडीची सत्ता येताच महागात पडली. जयस्वाल हे फडणवीस यांच्या जवळचे असले तरी भाजपचे स्थानिक नगरसेवक त्यांना पाण्यात पाहत होते. जयस्वाल यांना ठाण्यात चमक दाखवल्यावर आपल्याला क्रीम पोस्टिंग मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, विद्यमान सत्ताधाºयांना ते भाजपच्या जवळचे वाटल्याने त्यांची अपेक्षापूर्ती झाली नाही. याच उद्विग्नतेतून त्यांनी अधिकाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केलेले भाष्य ही उंटावरच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. पाच वर्षांत त्यांनी जे कमावले, ते एका दिवसात स्वत:च्या हातांनी गमावले. नगरसेवक आयुक्तांवर नाराज होतेच. अधिकारी आयुक्तांच्या टिप्पणीवरून दुखावल्याने त्यांनी मिळून त्यांच्याविरोधात एल्गार पुकारला. शहरातील प्रकल्पांबाबत आणि आयुक्तांनी घेतलेल्या अनेक भूमिकांबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी आक्षेप घेतले. यापुढे आपण एकाकी पडणार, याची कल्पना आल्याने त्यांना स्वत:हून ठाणे सोडण्याशिवाय गत्यंतर

 

 

Web Title: Why is this turn on 'Singham' in Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.