व्हॉट्सअप ट्रिपल तलाक प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:30 IST2019-05-15T21:23:05+5:302019-05-15T21:30:33+5:30
भिवंडी : मागील आठवड्यात शहरात गाजलेल्या व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून दिलेल्या तीन तलाक प्रकरणी अखेर भोईवाडा पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांच्या ...

व्हॉट्सअप ट्रिपल तलाक प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
भिवंडी : मागील आठवड्यात शहरात गाजलेल्या व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून दिलेल्या तीन तलाक प्रकरणी अखेर भोईवाडा पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे .
शहरातील पिडीत महिला आरजू ही सध्या कल्याण कोळसेवाडी या ठिकाणी वास्तव्यास असून नदीम शेख याच्या बरोबर तीचा विवाह सन २०१४ साली झाला होता. लग्नानंतर काही काळातच पीडित विवाहित महिला आरजू हिचा पती नदीम सासू आयशा व सासरे यासिन शेख यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. तिच्याकडे माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावला आणि तीला मारहाण करून घराबाहेर काढले. सध्या ती शहरातील आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतानाच तिच्या मोबाईलच्या व्हाट्सअॅपवर तीन वेळा तलाक लिहिलेला मेसेज करून तिला तलाक दिल्याचे कळविले .
या प्रकरणी पीडित महिला मागील पंधरा दिवस पोलीस व महिला मंडळांकडे न्यायासाठी फिरत होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी पूर्ण तपासाअंती गुन्हा दाखल केला जाईल,असे आश्वासन पिडीत महिलेला दिले. मंगळवार १४ मे २०१९ रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात महिलेचा जबाब नोंदवून पती नदीम व उत्तरप्रदेश येथे राहणारे सासरे यासीन व सासू आयेशा या तीनजणां विरोधात भादंवि कलम ४९८(अ), ३२३,५०४,३४ यासह मुस्लिम स्त्रियांच्या लग्नाचे हक्क संरक्षण करणारे दि २९ फेब्रुवारी २०१९ चे अध्यादेश चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा पहिला गुन्हा नोंद झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.