रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ठप्प असताना उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्याचे भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:22 IST2025-10-13T19:22:07+5:302025-10-13T19:22:20+5:30
Ulhasnagar News: पावसाळ्यात ठप्प पडलेल्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार कुमार आयलानी, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. गेल्या तीन वर्षापासून रस्ता बांधण्याच्या प्रतिक्षेत असून एकूण ६८ कोटींचा निधी मंजूर आहे.

रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ठप्प असताना उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्याचे भूमिपूजन
उल्हासनगर - पावसाळ्यात ठप्प पडलेल्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार कुमार आयलानी, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. गेल्या तीन वर्षापासून रस्ता बांधण्याच्या प्रतिक्षेत असून एकूण ६८ कोटींचा निधी मंजूर आहे.
उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्ता बांधणीसाठी राज्य शासनाने तीन टप्प्यात ६८ कोटींचा निधी मंजूर केला. रस्त्याचे काम गेल्या ३ वर्षापासून रखडल्याने, रस्त्यात खड्डेचखड्डे निर्माण होऊन नागरिक व वाहन चालकात संताप व्यक्त होत आहे. याप्रकाराने राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांच्या कारभारावर टिका होत आहे. पावसाळ्यापूर्वी आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते शांतीनगर येथे रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन होऊन रस्त्याच्या कामाला सुरवात झाली. मात्र रस्त्यावर रस्ता बांधण्यात आल्याने, रस्ता ऐक फूट उंच होऊन रस्त्याचे पाणी शेजारील दुकान व घरात जात असल्याची टिका होऊन रस्त्याचे काम ठप्प पडले आहे.
रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ठप्प असताना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन मंगळवारी दोन ठिकाणी आमदार कुमार आयलानी, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, बांधकाम विभागाचे प्रमुख प्रशांत मानकर यांच्या हस्ते झाले. एकाच रस्त्याचे भूमिपूजन तीन वेळा झाले असून रस्ता बांधणीला बुधवार पासून सुरवात होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मानकर यांनी दिली. रस्त्यावर रस्ता बांधत असल्याने, रस्ता ऐक फूट उंच झाल्याची टिका सर्वात प्रथम आमदार कुमार आयलानी यांनी करून रस्त्याच्या कामाला आक्षेप घेतला. कालांतराने आयलानी मात्र शांत झाले. या रस्त्याला मिळणारे इतर रस्ते उंच करण्याची कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.
रस्त्यात जीवघेणे खड्डे
कल्याण-बदलापूर रस्त्यात सतंतधार पावसाने अनिल-अशोक चित्रपटगृह, राधास्वामी सत्संग, शांतीनगर स्मशानभूमी आदी ठिकाणी जीवघेणे खड्डे होऊन खड्ड्यात ट्रक व टेम्पोचे चाक फसल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे कामही ठप्प पडले आहे.