गडकरी रंगायतनचा वैभवशाली पडदा गेला कुठे? प्रश्न विचारणारी भावनिक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:19 IST2025-08-18T15:14:27+5:302025-08-18T15:19:52+5:30

नाट्यगृहाची शान असणारा पडदाच दिसेनासा झाल्याने नाट्यरसिकांच्या मनात चलबिचल

Where did the glorious curtain of Gadkari Rangayatan go Emotional post asking questions is in the news | गडकरी रंगायतनचा वैभवशाली पडदा गेला कुठे? प्रश्न विचारणारी भावनिक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

गडकरी रंगायतनचा वैभवशाली पडदा गेला कुठे? प्रश्न विचारणारी भावनिक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाची शान असलेला पडदा गेला कुठे, असा प्रश्न विचारणारी भावनिक फेसबुक पोस्ट ज्येष्ठ रंगकर्मी व बालरंगभूमी परिषद, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार यांनी टाकली आणि सर्व रसिकांचे लक्ष वेधून घेतले.

नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनी पार पडला खरा; पण नाट्यगृहाची शान असणारा पडदाच दिसेनासा झाल्याने नाट्यरसिकांच्या मनात चलबिचल झाली आणि अखेर ती सोशल मीडियावर व्यक्त झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो पडदा पुन्हा लावावा, अशी सूचना ठाणे पालिका प्रशासनाला केली असली तरी, तो पडदा कधी लागणार, हा प्रश्न ठाणेकर नव्हे, तर संपूर्ण नाट्यरसिकांच्या मनात आहेच. नूतनीकरणासाठी गडकरी रंगायतनचा पडदा बंद होता. अखेर तो दिवस स्वातंत्र्यदिनी उजाडला… नूतनीकृत गडकरी रंगायतनचे लोकार्पण झाले. पण, रसिकांच्या मनात कायमचे घर केलेला तो वैभवशाली पडदा मात्र हरवला. याविषयी तुलालवार यांनी पोस्टद्वारे हळहळ व्यक्त केली.

१९७८ पासून जपली शान

गडकरी रंगायतनच्या मुख्य दर्शनी पडद्याबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे. १९७८ साली ‘चंदन नयन’ या कलाकाराच्या कल्पनारम्य दृष्टीतून साकारलेला हा पडदा होता. प्रत्येक नूतनीकरणानंतर हा पडदा जपलेला आढळायचा. प्रेक्षकांची भक्ती, रंगकर्मींची उर्मी या पडद्याशी जोडली होती, अशी तुलालवार यांनी माहिती दिली.

रसिकांचे मनोगत

कांचन फिरदोसी यांनी लिहिले... : नाट्यरसिकांना त्या पडद्याचे विस्मरण होणे शक्यच नाही. इतका भव्य, जाड पडदा कधी धुतला जात असेल? इतक्या वर्षांनंतरही छान, नवीन कसा दिसतो? भरतकामाचे टाके कसे उसवत नाहीत? आता तो पडदा नसेल म्हटल्यावर आपल्या अस्तित्वातलं काही तरी एकदम काढून घेतल्यासारखं वाटतं.
पल्लवी गुर्जर म्हणाल्या... : गडकरी रंगायतनचा मुख्य पडदा अनेक बदलांसह स्थिर आहे. चंदन-नयन यांनी डिझाइन केलेला मुख्य पडदा अजूनही भूतकाळ आणि त्याच्या परिवर्तनाचे स्मरण करतो.
पालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण : जुना पडदा जीर्ण झाला हाेता. त्यामुळे ताे काढण्यात आला आहे. पुन्हा तसाच पडदा तयार करण्यासाठी अधिक खर्च असल्याचे ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Where did the glorious curtain of Gadkari Rangayatan go Emotional post asking questions is in the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे