मैदानांच्या गैरसुविधांचे ग्रहण सुटणार तरी कधी?
By Admin | Updated: February 13, 2017 04:53 IST2017-02-13T04:53:33+5:302017-02-13T04:53:33+5:30
कल्याणमधील सर्वात मोठे मैदान म्हणून सुभाष मैदानाची ओळख आहे. क्रिकेट खेळासाठी चांगली खेळपट्टी असलेले शहरातील हे एकमेव मैदान आहे.

मैदानांच्या गैरसुविधांचे ग्रहण सुटणार तरी कधी?
कल्याणमधील सर्वात मोठे मैदान म्हणून सुभाष मैदानाची ओळख आहे. क्रिकेट खेळासाठी चांगली खेळपट्टी असलेले शहरातील हे एकमेव मैदान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडूही येथे खेळले आहेत. यात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर या खेळाडूंसह रॉनी इरानी, उस्मान अफजल या इंग्लडच्या कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचे पायही या मैदानाला लागले आहेत. सद्यस्थितीला रणजी खेळणारे बहुतांश कल्याणच्या खेळाडूंनीही याच मैदानावर काही काळ सराव केला आहे. परंतु येथील सुविधांच्या अभावामुळे कालांतराने अशा गुणवंत खेळाडूंना मुंबईला जावे लागते. विश्वविक्रम करणारा प्रणव धनावडे हे याचे ताजे उदाहरण आहे.
सध्या माटुंगा येथे सराव करणारा प्रणव सायंकाळी सुभाष मैदानावर सराव करतो. परंतु मध्यंतरी या विक्रमवीर खेळाडूला पोलिसांनी अपमानित करण्याचा प्रसंग घडला होता. या अवमान प्रकरणाचे क्रीडाक्षेत्रात तीव्र पडसाद उमटले होते. एका कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी मैदानावर हेलिपॅड बनविण्याच्या मुद्यावरून हा प्रसंग उद््भवला होता. खेळाडूंना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवरून ही मैदान नेमकी कशासाठी आहेत? असा सवाल उपस्थित झाला होता.
दरम्यान येथील सोयी-सुविधांचा आढावा घेता याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नगरसेवकाच्या निधीतून बांधण्यात आलेली ड्रेसिंग रूम कुलुपबंद, पॅव्हेलियनचा अभाव, गर्दुल्ले, भिकाऱ्यांसह जुगार खेळणाऱ्यांनी प्रेक्षक गॅलरीचा घेतलेला ताबा, मैदानावरील गवताची योग्य प्रकारे छाटणी न होणे, आऊटफिल्डला पाणीही मारले जात नाही, सुरक्षारक्षकांचा अभाव असे काहीसे चित्र पाहयला मिळते. महापालिकेचेही देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने देखभाल आम्ही ठेवतो अशी विनंती खाजगी संस्थांकडून करण्यात आली. परंतु त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.
विशेष बाब म्हणजे काहीजणांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले असून खेळाडूंना मोबदला घेऊन शिकविले जाते. यात पालिकेला कोणताही लाभ होत नसल्याने सद्यस्थितीला या मैदानाची स्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा है ’अशी काहीशी आहे.
१डोंबिवलीमधील सावळाराम महाराज क्रीडासंकुलाचीही स्थिती देखील आलबेल आहे असे नाही. याठिकाणी लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रम होत असल्याने याला क्रीडासंकुल नव्हे तर लग्न संकुल म्हणणे सोयीस्कर आहे. या मैदानावर झालेले मॉलचे अतिक्रमण हा वादाचा मुद्दा अद्यापपर्यंत जैसे थे आहे. शहरातील हे सर्वात मोठे मैदान आहे. इतर मैदाने छोटी आणि अपुरी आहेत. त्यामुळे खेळाडूंची सर्वाधिक पसंती या मैदानाला असते. मात्र त्याठिकाणी खेळणे आणि सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे वास्तव आहे.
२वर्षभर याठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल असते. नुकतेच हे मैदान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वापरण्यात आले. यात मैदानाची नासधूस झाल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे.
३यात क्रि केटची खेळपट्टीही उखडण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे आता सराव कुठे करायचा? असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे. यावर तातडीने डागडुजी केली जाईल असे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी त्यांच्यातील एकंदरीतच तप्तरता पाहता त्यांच्याकडून ठोस कृती होईल का? याबाबत साशंकता आहे.
असुविधांचे मैदान : सुधाकर शेट्टी
कल्याणच्या सुभाष मैदानात सुविधा देण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले अशी खंत प्रशिक्षक आणि ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुधाकर शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिकही याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यांना काहीवेळेला बॉल लागून दुखापत होते. या दृष्टीने त्यांच्या सुरक्षेची देखील प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी खेळाडूंच्या खेळावर देखील टाच आणली जाणार नाही याचीही दक्षता घ्यावी असे शेट्टी म्हणाले.
सांगा, सुरक्षा कशी पुरवायची?
डोंबिवलीतील क्रीडा संकुल वगळता अन्य कोणत्याही मैदानांना सुरक्षा कर्मचारी देण्यात आलेले नाहीत. महापालिका मुख्यालयांसह विभागीय, प्रभाग कार्यालये यांना सुरक्षा पुरवावी लागते त्यातच उद्यान, स्मशानभूमी याठिकाणीही सुरक्षा कर्मचारी नेमावे लागतात. त्यात अपुरे मनुष्यबळ असल्याने मैदानांना सुरक्षा पुरविणे शक्य होत नसल्याचे स्पष्टीकरण सुरक्षा विभागाने दिले आहे. सद्यस्थितीला ४५० सुरक्षा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यात सरकारने केवळ २६९ पदांना मान्यता दिली आहे. यात १०० पदे रिक्त आहेत. मैदाने, उद्याने वाढली, परंतु सुरक्षा कर्मचारी वाढले नाहीत त्यामुळे भले उद्यान विभागाकडून सुरक्षेच्या अनुषंगाने पत्रव्यवहार केला जात असला तरी आजमितीला मैदानांना सुरक्षा पुरविणे शक्य नसल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.
सुभाष मैदानात काही त्रुटी : संजय जाधव
सुभाष मैदानामध्ये काही त्रुटी आहेत. मात्र अन्य मैदाने सुस्थितीत असल्याचा दावा केडीएमसीचे उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी केला आहे. सुभाष मैदानावरील जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणी संरक्षक जाळी लावण्यात येणार असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही. सुरक्षा पुरविण्यासंदर्भात संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नेहरू मैदानाच्या नूतनीकरणाचा देखील प्रस्ताव असून कल्याण पूर्वेकडील शंभर फुटी रोडवर दोन मैदाने तयार करण्यात आली असून ती सुस्थितीत आहेत. याठिकाणी एक मैदान आमदार आणि महापालिकेच्या निधीतून बांधण्यात आले असून अन्य एक मैदान महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आले आहे. अंदाजपत्रकात एक ते दीड कोटींची तरतूद केली जाते. यात मैदानांच्या देखभाल दुरूस्तीबरोबरच नवीन मैदानांच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
खड्ड्यांमुळे सराव कसा करायचा : प्रशांत चव्हाण
वेळेअभावी मुंबईला जाऊन सराव करणे शक्य होत नाही. त्यामुळे कल्याणमधील मैदानांवरच सराव केला जातो. परंतु सुभाष मैदानाचा हवा तसा विकास झालेला नाही. बहुतांश ठिकाणी खड्डे आहेत. यामुळे धावताना त्रास होतो. सिमेंटच्या जॉगिंग ट्रॅक बांधला आहे. परंतु त्याठिकाणी खेळाडू सराव करू शकत नाही.
शहरातील अन्य मैदाने देखील सुस्थितीत नाहीत. स्वच्छतागृहांचीही वानवा आहे. त्यामुळे खाजगी क्रीडा संस्थांच्या माध्यमातून तयार झालेल्या मैदानांवर खेळाचा सराव करणे भाग पडते. शहरात चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत त्यासाठी ठोस कृती होणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेला त्यांच्या या कर्तव्याचा विसर पडल्याचे कबड्डीपटू प्रशांत चव्हाण म्हणाले.
मैदानात कचऱ्याच्या गाड्या
एकीकडे केडीएमटीच्या डोंबिवलीतील खंबाळपाडा आगारात कचऱ्याच्या गाडया उभ्या केल्या असताना दुसरीकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मैदानांचाही वापर करायला सुरूवात केली आहे. कल्याणमधील वासुदेव बळवंत फडके मैदानात कचऱ्याच्या गाडया उभ्या केल्या जात असल्याने या मैदानाला डंम्पिग ग्राऊंडचे स्वरूप येण्यास वेळ लागणार नाही. येथेही सुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंना गैरसोयीला सामोरे जावे लागते. मेळावे, संमेलने, धार्मिक कार्यक्रमासाठी मैदान बहुतांशवेळा बुकिंग असल्याने मैदानावर खेळायचे कधी असा सवाल केला जात आहे.
गुणवत्ता असूनही कदर नाही : प्रणव धनावडे
चांगली मैदाने असली पाहिजेत यासाठी आमचा खेळाडू म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. येणाऱ्या भावी पिढीचाही विचार व्हावा. गुणवान खेळाडूंना योग्य प्रकारे सुविधा मिळाव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे. माझ्या विश्वविक्रमानंतर कल्याण पूर्वेला क्रीडासंकुल उभारण्यात येईल अशी घोषणा राजकीय मंडळींकडून करण्यात आली होती. परंतु अद्याप ती अंमलात आलेली नाही. कल्याणचा विचार करता याठिकाणी एकमेव असे मोठे मैदान म्हणून सुभाष मैदान आहे. परंतु सुविधांच्या अभावात हे मैदान क्रिकेट खेळण्यासाठी निरूपयोगी ठरत आहे असे विश्वविक्रमवीर प्रणव धनावडे म्हणाला.