सूतिकागृहाचे नूतनीकरण कधी? नागरिकांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:44 IST2018-08-27T04:44:10+5:302018-08-27T04:44:26+5:30
भारिप बहुजन महासंघाचे : शुक्रवारी धरणे

सूतिकागृहाचे नूतनीकरण कधी? नागरिकांना प्रतीक्षा
डोंबिवली : केडीएमसीचे येथील सूतिकागृह अनेक वर्षे बंद आहे. सद्य:स्थितीत महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयामधून मिळणारी सेवा ही रामभरोसे असताना धोकादायक अवस्थेतील सूतिकागृहाचे नूतनीकरण करायला प्रशासनाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. यात गर्भवतींची होत असलेली परवड पाहता भारिप बहुजन महासंघाच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले जााणार आहे. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या परिसरात हे आंदोलन छेडले जाणार आहे.
डोंबिवली पूर्वेतील टिळक रोडवर मध्यवर्ती ठिकाणी हे सूतिकागृह आहे. ४१ वर्षे जुन्या असलेल्या सूतिकागृहात २०१३ मध्ये प्लास्टर कोसळले होते. त्यानंतर, तातडीने हे सूतिकागृह बंद करण्यात आले होते. येथील कारभार डोंबिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आला. येथील बाळंतपणाची तसेच लसीकरणाची सुविधा पूर्वेकडील पंचायत बावडीनजीकच्या नागरी आरोग्य केंद्रात करण्यात आली. दरम्यान, सूतिकागृहाच्या स्थलांतरामुळे गर्भवतींची परवड लक्षात घेता संबंधित वास्तूचे नूतनीकरण होणे आवश्यक होते. परंतु, केडीएमसी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने गर्भवतींची परवड कायम राहिली आहे. दरम्यान, नूतनीकरणाचा खर्च परवडणार नसल्याने या वास्तूचे मूळ बांधकाम सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर करण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला. तर, उर्वरित काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर करण्याचा निर्णय होता. परंतु, पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. २०१६ मध्ये खा. श्रीकांत शिंदे यांच्यासह तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर, तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दौरे करून पाहणीदेखील केली होती. याउपरही नूतनीकरणाबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत.
सावित्रीबार्इंचे नाव द्या
सूतिकागृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली. या मागणीचा विचार व्हायला हवा, असे मत भारिप बहुजन महासंघाचे डोंबिवली शहर महासचिव मिलिंद साळवे यांनी व्यक्त केले.