ठाणे : शहराच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा काही चुकीची कामे प्रशासनाकडून सुरू असतील, तर त्यासंदर्भात प्रश्न विचारले म्हणजे नगरसेवक चोर होतो का, असा उद्विग्न सवाल शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी महासभेत विचारला. यावरून अनेक सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.महासभा सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासाला शिवसेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे त्यांना दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या अनुषंगाने बोलत होत्या. प्रशासनाने दिलेले उत्तर मोघम असून अशा पद्धतीने वारंवार प्रश्न विचारूनही प्रशासनाकडून अशा पद्धतीने उत्तरे मिळत असतील, तर आम्ही प्रश्न विचारायचेच नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. याच अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी नगरसेवक प्रश्न विचारतो, म्हणजे तो काही अपराध करतो का? शहर विकासाच्या दृष्टीने किंवा काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर तो प्रश्न विचारत असतो. त्यात त्याचा स्वार्थ असत नाही. त्यामुळे एखाद्याने प्रश्न विचारला म्हणजे तो चोर होतो का, याचा प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. दुसरीकडे प्रश्नोत्तरे कायद्याने किंवा नियमाने विचारली जावीत. नियमाच्या अनुषंगाने असतील, तरच त्याचा प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांनी केली. त्यानुसार, जे नियमानुकूल नसतील, त्या प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक नसल्याचे मत सचिव अशोक बुरपुल्ले यांनी व्यक्त केले. त्यांच्या उत्तरावरून सत्ताधारी नगरसेवक संतप्त झाले आणि यापूर्वी अशा प्रकारे किती प्रश्न आपण नाकारली, याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. तसेच हे प्रश्न नाकारण्याचा अधिकार महापौरांना असल्याने प्रशासनाने त्यांनी त्यांचे काम करावे, अशी समजही सेना नगरसेवकांनी प्रशासनाला दिली.
प्रश्न विचारले तर नगरसेवक चोर होतात का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:58 IST