कल्याणमधील गांडूळ खत प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:47 AM2020-02-18T00:47:33+5:302020-02-18T00:47:37+5:30

ओल्या कचऱ्याचा तुटवडा : महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका

Welfare plant closed in Kalyan | कल्याणमधील गांडूळ खत प्रकल्प बंद

कल्याणमधील गांडूळ खत प्रकल्प बंद

Next

कल्याण : पश्चिमेतील म्हसोबा मैदानात शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, त्यास महापालिका प्रशासनाकडून पुरेसा ओला कचरा पुरविला जात नसल्याने हा प्रकल्प बंद पडला आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता त्याला कारणीभूत आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

महापालिका हद्दीत कचºयाची समस्या मोठी आहे. आधारवाडी डम्पिंगची क्षमता संपल्याने ते शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी सौराष्ट्र या कंत्राटदार कंपनीने तेथे प्रकल्प उभारला आहे. मात्र, डम्पिंगवर दररोज ६४० मेट्रीक टन कचरा टाकला जातो. तेथे सुरू असलेला प्रकल्प व तेथे दररोज पडणारा कचरा यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे उंबर्डे व अन्य घनकचरा प्रकल्प सुरू झाल्याशिवाय हे डम्पिंग बंद होणार नाही. डम्पिंगवरील कचºयाच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ओल्या कचºयावर प्रक्रिया झाल्यास हा कचरा डम्पिंगवर जाणार नाही. त्यामुळे दुर्गंधीच्या त्रासातून नागरिकांची सुटका होईल.

एक हजार किलो ओल्या कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प पाटील यांनी मनसृष्टी या संस्थेच्या पुढाकारातून त्यांच्या प्रभागातील एका मैदानात २०१६ मध्ये सुरू केला. चारपाच महिने कचºयावर प्रक्रिया झाली. मात्र, नंतर प्रकल्पास केवळ ५०० किलो ओला कचरा प्राप्त होऊ लागला. या प्रकल्पाची क्षमता एक हजार किलोची होती. पुरेशा कचºयाअभावी प्रकल्पातील गांडूळ मरण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे प्रकल्प बंद पडण्यास महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, असे पाटील यांचे म्हणणे आहे.
महापालिकेने १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पाच ठिकाणाचे प्रकल्प तयार झाले. उंबर्डे व बारावे येथे बायोगॅस प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांनाही पुरेसा ओला कचरा प्रक्रियेसाठी मिळत नसल्याची बाब स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी नुकतीच महापालिकेच्या आढावा बैठकीत मांडली होती. कचरा वर्गीकरण करण्याबाबत महापालिका जागृती करत आहे. मात्र, प्रकल्पच नसल्याने वर्गीकरणाचा हेतू कसा साध्य होणार, असा सवाल नागरिक करतात. महापालिकेने १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा वर्गीकरण करून गोळा करण्यासाठी १०७ कोटींचे कंत्राट दिले आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, पाटील यांच्या आरोपांसंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

...तर कचºयाची विल्हेवाट प्रभागांतच
प्रक्रियेसाठी आणलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून ओला कचरा प्रकल्पासाठी घ्यावा लागत होता. पाटील यांच्या प्रभागातील प्रकल्प यशस्वी झाला असता तर हाच प्रयोग अन्य प्रभागांत सुरू करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला असता. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील कचºयाची तेथेच विल्हेवाट लागून गांडूळ खत तयार झाले असते.
 

Web Title: Welfare plant closed in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.