आयुक्तांनी बदली मागितली तरी आम्ही सोडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:53+5:302021-06-29T04:26:53+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस केंद्र सरकारचा मिळालेला कोरोना इनोव्हेशन अवॉर्ड आणि आंबिवली टेकडीवर फुलविलेली वनराई, याबद्दल शिवसेना आमदार विश्वनाथ ...

आयुक्तांनी बदली मागितली तरी आम्ही सोडणार नाही
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस केंद्र सरकारचा मिळालेला कोरोना इनोव्हेशन अवॉर्ड आणि आंबिवली टेकडीवर फुलविलेली वनराई, याबद्दल शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सत्कार केला. दरम्यान, आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरू असल्याने आयुक्तांनी बदली मागितली तरी आम्ही त्यांना सोडणार नाही, असे विधान भोईर यांनी यावेळी केले.
पश्चिमेतील उंबर्डे येथे मनपा आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सोमवारी ७२० झाडे लावण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी भोईर यांनी वरील विधान केले. यावेळी भाजप खासदार कपिल पाटील, मनपाच्या शहर अभियंत्या सपना कोळी, मनपा सचिव संजय जाधव, माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, भाजप पदाधिकारी प्रभू म्हात्रे, डॉ. शुभा पाध्ये, प्रतिष्ठानचे प्रकाश तरे आदी उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, खासदार कपिल फाउंडेशनकडून लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारने जाहीर केले आहे की, २५ टक्के लस खासगी रुग्णालयातून घ्यावी, त्याचे कौतुक झाले पाहिजे. समजा फाउंडेशनतर्फे ५० हजार जणांना लस दिली गेल्यास सरकारकडून मनपास उपलब्ध होणारे डोस समान्य नागरिकांना उपलब्ध होतील. आतापर्यंत फाउंडेशनने १० हजार जणांचे लसीकरण पार पाडले आहे. फाउंडेशनने त्याकरिता केंद्र सरकारकडून लसीचे एक लाख डोस विकत घेतले आहेत. एका डोसमागे ७८३ रुपये मोजले आहेत. त्यापैकी ६०० रुपये डोसची किंमत आहे. तर, डोस देण्यासाठी डॉक्टर, नर्ससाठी १५० रुपयांचा खर्च होतो. त्यात कसलीही कमाई नाही. मुंबईत तर एक डोस १२०० रुपयांना दिला जात आहे. दरम्यान, सरकारकडून मनपास कमी डोस मिळत असल्याने लसीकरणाची प्रक्रिया वेगाने होत नाही.
----------