पाणीपुरवठा विभागाने मारली १०० कोटी रुपयांची मजल; थकबाकीदारांवर करणार कठोर कारवाई   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:48 PM2021-01-28T23:48:01+5:302021-01-28T23:48:24+5:30

ठाणे महापालिका : अवघ्या काही वर्षांपूर्वी जकात सुरू असताना मनपाला हक्काचे उत्पन्न मिळत होते

Water supply department hits Rs 100 crore; Strict action will be taken against the arrears | पाणीपुरवठा विभागाने मारली १०० कोटी रुपयांची मजल; थकबाकीदारांवर करणार कठोर कारवाई   

पाणीपुरवठा विभागाने मारली १०० कोटी रुपयांची मजल; थकबाकीदारांवर करणार कठोर कारवाई   

Next

ठाणे : कोरोनामुळे ठाणे मनपाच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. असे असतानाही पाणीपुरवठा विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत जास्तीची वसुली केली आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत तर मनपाच्या तिजोरीत एका नव्या पैशाचीही भर पडली नाही. मात्र  जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सरकारने सुरुवात केली. याचा फायदा मनपालाही झाला व मालमत्ताकराची वसुली सुरू झाली. दुसरीकडे जुलै अखेरपासून पाणीपट्टीची वसुलीही सुरू झाली. त्यानुसार आतापर्यंत १०० कोटींची वसुली झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ती सहा कोटींनी अधिक आहे.

अवघ्या काही वर्षांपूर्वी जकात सुरू असताना मनपाला हक्काचे उत्पन्न मिळत होते. सुरुवातीला जकात बंद करून एलबीटी सुरू करण्यात आली, तेव्हा मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घसरले. त्यातच सामान्य टॅक्स, पाणीपट्टी, शहर विकास विभागाचे उत्पन्नही कमी झाले, त्यानंतर एलबीटीही बंद झाली आणि मनपाच्या उत्पन्नाला पुन्हा घरघर लागली, तेव्हापासून उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधण्यास सुरुवात झाली, तसेच मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात झाली.

गेल्या वर्षीपेक्षा जास्त वसुली
मागील वर्षी मार्चपासून लॉकडाऊनचा परिणाम उत्पन्नावर झाला. तेव्हापासून बहुतांश आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. दोन महिन्यांनंतर जूनपासून पालिकेच्या मालमत्ता कराची वसुली सुरू झाली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीबिल वसुलीची ही मोहीम जुलै अखेरपासून सुरू असून गेल्या वर्षी १ एप्रिल ते २७ जानेवारीदरम्यान ९४ कोटींची वसुली झाली होती. मात्र यंदा कोरोना काळात याच दरम्यान सुमारे १०० कोटींची वसुली झाली आहे. आता पाणीपुरवठा विभागाने आपले लक्ष थकबाकीदारांकडे वळविले असून ती वसुली करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिला आहे.

Web Title: Water supply department hits Rs 100 crore; Strict action will be taken against the arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.