लोढांची लाखमोलाची ‘पलावा’ बुडाली; स्मार्ट सिटीचे धिंडवडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 11:13 PM2019-08-05T23:13:00+5:302019-08-06T06:48:02+5:30

देसाई खाडीत केलेल्या बांधकामांचा बसला फटका

water logging at palava city after heavy raining | लोढांची लाखमोलाची ‘पलावा’ बुडाली; स्मार्ट सिटीचे धिंडवडे

लोढांची लाखमोलाची ‘पलावा’ बुडाली; स्मार्ट सिटीचे धिंडवडे

googlenewsNext

डोंबिवली : मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी डोंबिवलीजवळ कल्याण-शीळ मार्गावर देसाई खाडी बुजवून उभी केलेली पलावा ही स्मार्ट सिटी गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसात बुडाली. लक्षावधी रुपये खर्च करून येथे आलिशान फ्लॅट घेतलेल्यांची महागडी वाहने पुराच्या पाण्यात होडीसारखी तरंगत होती. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर करून प्रमोशन केलेल्या या प्रकल्पाची अब्रू चव्हाट्यावर आली.

पलावा सिटीला लागून असलेली देसाई खाडी ही मलंगगड येथून मुंब्रा खाडीला मिळते. २६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुराच्या वेळीही पलावा सिटी पाण्याखाली गेली होती. मात्र, त्यावेळी या ठिकाणी फ्लॅटची एवढी मोठी विक्री झाली नव्हती. मात्र, तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा देसाई खाडी कोपली आणि पलावा सिटीत पाणी घुसले. पूर नियंत्रणरेषेच्या पलीकडे बांधकामे न करता ती खाडीकिनारी केल्याचा फटका पलावातील रहिवाशांना बसला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने पलावा सिटीला भेट देऊन पुरामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांसोबत बातचीत केली असता त्यांनी मात्र केवळ पाच सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. इतरत्र फारसे काहीच नुकसान झाले नाही, असा दावा केला. सोमवारी येथील सोसायटींमधील पाणी पूर्णपणे ओसरले होते. परंतु, रस्त्यांवर मात्र काही प्रमाणात पाणी व चिखल अद्यापही साचल्याचे पाहायला मिळाले.

शनिवार आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली शहरांची दाणादाण उडवून दिली होती. सर्वाधिक फटका खाडीलगत असलेल्या भागाला बसला. दोन्ही शहरांतील सोसायट्या आणि चाळी तर पाण्याखाली गेल्याच, पण पलावासारखी सिटी आणि मोठी गृहसंकुले यांच्यातही पुराचे पाणी घुसले होते. तळ मजल्यावरील पार्किंगचा परिसर पाण्याखाली गेल्याचे चित्र पलावा सिटीत पाहावयास मिळाले. ‘कासारीओ पलावा’ आणि ‘कासाबेला गोल्ड’ या दोन भागांत पलावा सिटी विभागली आहे. ‘कासाबेला’ला फारसे पाणी भरले नव्हते. परंतु, ‘कासारीओ’ येथील परिसर संपूर्णपणे जलमय झाला होता. तेथील भीषण परिस्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

रस्त्यावर अद्याप पाणीच पाणी
रविवारी येथील सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. सोमवारी याठिकाणचे पाणी ओसरले होते. परिसराची स्वच्छता करण्यात येत असल्याचे दिसून आले. ‘कासारीओ’ या गृहसंकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी पुराचे पाणी, चिखल साठल्याचे दिसून आले. येथील चौकांमध्येही पाणी असल्याने दुचाकीस्वारांना पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. स्मार्ट सिटीचे ओंगळवाणे चित्र तेथे पाहायला मिळाले.

पलावातील काही परिसर जलमय होण्यास खाडी परिसरात सुरू असलेले पुलाचे बांधकाम जबाबदार आहे. त्यामुळेच सोसायटीमधील तळ मजला पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु, पलावा सिटी मॅनेजमेंटचे मोठे सहकार्य रहिवाशांना मिळाले.
-ऐश्वर्य कोल्हटकर, रहिवासी, ‘मरिना’ सोसायटी

Web Title: water logging at palava city after heavy raining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस