विजेचा धक्का बसून वॉचमनचा मृत्यू, बिल्डरविरुद्ध कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 18:39 IST2022-07-03T18:39:41+5:302022-07-03T18:39:58+5:30
उल्हासनगर भाटिया चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस एका इमारतीचे काम सुरू आहे

विजेचा धक्का बसून वॉचमनचा मृत्यू, बिल्डरविरुद्ध कारवाईची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ भाटिया चौक स्टेट बँकेच्या मागील इमारती मधील वॉचमनला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. वॉचमनच्या नातेवाईकांनी संबंधित बिल्डरावर कारवाई करण्याची मागणी केली असून विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.
उल्हासनगर भाटिया चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस एका इमारतीचे काम सुरू आहे. इमारती मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून अर्जुन सरोज नावाचा वॉचमन राहतो. रविवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावर त्याला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलीस व वॉचमन यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. वॉचमन यांचा मृत्यू इमारत बिल्डरच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.