कचरावेचकांच्या मुलांसाठी वेचले ज्ञानाचे कण; संगीता हेगडे यांनी ५८० मुलांना आणले शिक्षणप्रवाहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 00:35 IST2020-03-08T00:34:50+5:302020-03-08T00:35:14+5:30
कोल्हापूर येथे शालेय शिक्षण घेतलेल्या संगीता यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्याचे पदवी शिक्षण घेतले.

कचरावेचकांच्या मुलांसाठी वेचले ज्ञानाचे कण; संगीता हेगडे यांनी ५८० मुलांना आणले शिक्षणप्रवाहात
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : डम्पिंग ग्राउंड ही शहरीकरणाची बडी समस्या आहे. तेथे कचरावेचक महिला-पुरुष काम करतात. या कचरावेचकांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संगीता हेगडे या सात वर्षांपासून काम करत आहेत. मूव्हमेंटच्या समन्वयक म्हणून त्यांनी हे आव्हान स्वीकारले. आतापर्यंत त्यांनी कचरावेचकांच्या ५८० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्यापैकी काहींना उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करूनही दिले आहे.
कोल्हापूर येथे शालेय शिक्षण घेतलेल्या संगीता यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्याचे पदवी शिक्षण घेतले. मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केले आहे. २०१२ मध्ये कल्याणमध्ये ‘नवोदय’ या प्रकल्पात काम करण्यास सुरुवात केली. कचरावेचक मुलांसाठी सुरू झालेला हा प्रकल्प अधिकच आव्हानात्मक होता. त्यासाठी त्यांना १६ जणांची मदत मिळाली. कल्याण आणि भिवंडी येथील कचरावेचकांच्या मुलांसाठी त्यांनी बालवाडी सुरू केली. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड येथील साठेनगरातील ४५ मुले शाळेत येऊ लागली. या मुलांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी नवोदयने स्वीकारली. कचरावेचकासाठी बचतगट तयार करून त्यांना स्वावलंबी बनवले. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी येथील १३६ कचरावेचकांना दुसरे काम उपलब्ध करून दिले. त्यांसाठी आर्थिक साहाय्यही केले जाते.
बदल घडण्यासाठी तीन वर्षे लागली; अनेक उच्चशिक्षित झाले!
संगीता हेगडे म्हणाल्या की, बदल दिसून येण्यासाठी तीन वर्षे जावी लागली. उच्चशिक्षण घेतलेली मुलेही कचरावेचत होती. त्यांच्या हाताला काम दिले. नवोदय आता चळवळ झाली आहे. त्याद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आलेले काही विद्यार्थी आयआयटी झाले आहेत, तर काही पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत. हा बदल घडविताना खूप प्रयत्न करावे लागले.