गटाराच्या कामादरम्यान भिंत कोसळून १ ठार; २ जखमी
By Admin | Updated: April 25, 2017 00:07 IST2017-04-25T00:07:42+5:302017-04-25T00:07:42+5:30
गटाराचे काम सुरू असताना लगतच्या इमारतीची कुंपण भिंत कोसळून १ मजूर ठार, तर २ मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी

गटाराच्या कामादरम्यान भिंत कोसळून १ ठार; २ जखमी
मीरा रोड : गटाराचे काम सुरू असताना लगतच्या इमारतीची कुंपण भिंत कोसळून १ मजूर ठार, तर २ मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास भार्इंदरच्या जेसल पार्क भागात घडली.
येथील रेल्वे समांतर मार्गावर महापालिकेने गटाराचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यासाठी १५ ते २० फूट खोदकाम केले आहे. काम सुरू असताना रात्री पावणेआठच्या सुमारास लगतच्या एंजल इमारतीची कुंपण भिंत कोसळली. त्या वेळी तेथे काम करत असलेल्या तीन मजुरांपैकी मुन्ना (४०) हा मजूर मरण पावला, तर रवी चौधरी (२०) व मोहम्मद अकलास आलम (२०) हे जखमी झाले. जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडेंसह प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे, सुनील यादव, नवघर पोलीस घटनास्थळी धावून आले.
महापालिकेने सदर कामाचे कंत्राट बोरिवलीच्या स्पार्क सिव्हिल इन्फ्रा प्रोजेक्टला दिले आहे. गटार बांधण्यासाठी खोल खोदकाम केले जात असताना लगतची कुंपण भिंत कोसळण्याची शक्यताच विचारात घेतलेली नाही. महापालिका व ठेकेदार यांनी आवश्यक खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडला. (प्रतिनिधी)