मागास निधीसह प्रभाग सुधारणा निधीला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:29 IST2018-04-03T06:29:16+5:302018-04-03T06:29:16+5:30
मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेने मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधीसह मागासवर्गीय निधीला सपशेल कात्री लावली आहे. तसेच प्रभाग सुधारणा निधी जरी दिला असला तरी तो तुटपुंजा आहे. त्यामुळे आता तीन दिवस चालणाऱ्या अंदाजपत्रकावरील चर्चेत पुन्हा ठराव होऊन त्यासाठी नगरसेवकांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

मागास निधीसह प्रभाग सुधारणा निधीला कात्री
ठाणे - मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेने मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधीसह मागासवर्गीय निधीला सपशेल कात्री लावली आहे. तसेच प्रभाग सुधारणा निधी जरी दिला असला तरी तो तुटपुंजा आहे. त्यामुळे आता तीन दिवस चालणाऱ्या अंदाजपत्रकावरील चर्चेत पुन्हा ठराव होऊन त्यासाठी नगरसेवकांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदाप्रमाणे मागील वर्षीदेखील नगरसेवक निधीसह इतर निधीसाठी तरतूदच केली नसल्याची बाब सोमवारच्या अर्थसंकल्पीय विशेष महासभेत नगरसेविका साधना जोशी यांनी निदर्शनास आणली. ही बाब अतिशय गंभीर असून केवळ नगरसेवकच नाही, तर महापौरांनी सुचवलेल्या कामांच्या बाबीतील निधीचादेखील यात उल्लेख नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नगरसेवक निधी, मागासवर्गीय निधीसाठी तरतूद करावी.
तसेच मागील वर्षी महापौरांनी सुचवलेल्या कामांसाठी ११ कोटींची तरतूद महासभेने प्रस्तावित केली होती. यंदा त्यात वाढ करून ती १५ कोटींची करावी, अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे प्रभाग सुधारणा निधीदेखील केवळ ११ कोटीच दिला असून तो अतिशय तुटपुंजा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी या मुद्याला हात घातल्याने आता तीन दिवस चालणाºया या महासभेत मागासवर्गीय निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून प्रभाग सुधारणा निधीतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खर्च झालेला नगरसेवक निधी...
२०१२-१३ साली २७ कोटी २४ लाखांच्या नगरसेवक निधीपैकी २० कोटी ५६ लाख रु पये खर्च झाले होते. २०१३-१४ साली ३५ कोटी ८३ लाखांपैकी २३ कोटी ३८ लाख, २०१४-१५ मध्ये ४२ कोटी ८० लाखांपैकी २४ कोटी ६१ लाख, तर मागील वर्षी ४८ कोटींपैकी २९ कोटी ६८ लाख खर्च झाले होते. मागील चार वर्षांतला जवळपास २१ कोटी रु पयांचा शिल्लक निधी आणि यंदाचे जवळपास ३० कोटी असा ५१ कोटी ६१ लाखांचा नगरसेवक निधी २०१६ मध्ये उपलब्ध झाला. त्यानुसार, त्याचे प्रगती पुस्तक तयार करण्याचे पालिकेने निश्चित केले. परंतु, त्याचे काय झाले, याचे उत्तर मात्र सध्या तरी प्रशासनाकडे नाही. एकूणच या पुस्तकाबद्दल साशंकता आहे.