ठाण्यात आता शिटीचाही आवाज घुमणार
By Admin | Updated: January 31, 2017 03:07 IST2017-01-31T03:07:51+5:302017-01-31T03:07:51+5:30
पालघर जिल्ह्यातील वसई-विरार या महापालिकेत सत्तारुढ असलेल्या बहुजन विकास आघाडीने ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी कंबर कसली आहे.

ठाण्यात आता शिटीचाही आवाज घुमणार
ठाणे : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार या महापालिकेत सत्तारुढ असलेल्या बहुजन विकास आघाडीने ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी कंबर कसली आहे. ४० ते ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून मागील २५ वर्षात त्याच-त्या सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यांना कंटाळलेल्या ठाणेकर नागरिकांना बविआ हा पर्यायी पक्ष ठरु शकणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
वसई, विरार, नालासोपारासह पालघर जिल्ह्यात प्राबल्य असणारा बविआ प्रथमच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पक्षाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.
वसई, विरार येथे केलेल्या विकास कामांचा दाखला देऊन ठाणे शहरात विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढवण्याचा चंग बविआ या पक्षाने बांधला आहे. त्यातच या पक्षाने ठाण्यातील प्रभाग १,२, ३,६,१०,११,१६, २३,२५,३०,३२ या प्रभागांवर लक्ष केंद्रीत करून तेथे प्रमुख्याने उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने प्रतिस्पर्धींशी दोनहात करण्याची तयारी सुरू केली आहे.
बविआने इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या येत्या रविवारी थेट मुलाखती घेतल्या जाणार असल्याची बविआचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विशाल ननावरे यांनी दिली. (प्रतिनिधी)