नालासोपारा - विरार येथील रमाबाई अपार्टमेंटच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १७ मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची मागणी भाजपाचे आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्घटनेचा आढावा घेऊन मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचबरोबर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांना पाठवून पीडितांना साह्य केले.
गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच विरार पूर्व भागात रात्री पावणेबाराच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवाशी अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत १७ रहिवाशांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या एक वर्षीय मुलीचाही समावेश आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ९ रहिवाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार राजन नाईक यांनी तातडीने दुर्घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल व मनपाच्या आपत्कालीन विभागाकडून बचावकार्याबाबत माहिती घेतली होती.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून भरीव आर्थिक मदत करावी. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनाही दुर्घटनास्थळी भेट देण्याची विनंती केली होती.
मंत्री गिरीष महाजन यांनी आज दुपारी विरारला भेट दिली.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली अशी माहिती भाजपा वसई विरार जिल्हा महासचिव मनोज बारोट यांनी दिली आहे.