Violation of corona rules, order of use of masks | कोरोना नियम, मास्क वापराच्या आदेशाचे उल्लंघन; नागरिकांमध्ये वाढतेय बेफिकिरी

कोरोना नियम, मास्क वापराच्या आदेशाचे उल्लंघन; नागरिकांमध्ये वाढतेय बेफिकिरी

पंकज राऊत

बोईसर : राज्यातील अनेक भागांत पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कोविड नियमांचा भंग तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. मात्र तरीही जिल्ह्याच्या अनेक भागांत नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. 

बोईसर आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रात सर्रासपणे कोरोना नियमांचे उल्लंघन  होत असून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावले जात आहेेेत. बोईसर येथे नेमलेले पथक कासवाच्या गतीने दंडात्मक कारवाई करीत आहे. एकीकडे पालघर जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, बँक्वेट हॉल, रेस्टॉरंट, नाट्य व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने व बाजाराची ठिकाणे आदी गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी वेळोवेळी अचानक भेटी देऊन कोविड नियमांचा भंग केल्यास कारवाई तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर रु.२००/- एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई केली जात आहे.

यासाठी ग्रामपंचायतनिहाय तपासणीसाठी फिरते पथक पालघरचे तहसीलदार तसेच पालघर तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी बोईसर शहरासाठी नेमून अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र बोईसर व तारापूर औद्योगिक क्षेत्रात बहुसंख्य रिक्षाचालक, फेरीवाले, भाजी व फळविक्रेते, दुकानदार, रिक्षा व एसटीतून प्रवास करणारे, कामगार आणि नागरिक इत्यादी तोंडावर मास्क न लावता सरळसरळ विनामास्क फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहावयास मिळत आहे. 

बोईसर व परिसराची लोकसंख्या दीड लाखांच्या घरात असून तारापूर एमआयडीसीमध्ये प्रतिदिन हजारोंची ये-जा असते. त्यामानाने कारवाई संथगतीने सुरू आहे. जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर किंवा त्यांच्या आस्थापनेवर कठोर कारवाईची मागणी होत असून रिक्षा व एसटीतून मास्कशिवाय प्रवास करण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. तसेच रिक्षातून ओव्हरलोड प्रवासी वाहतूक होत आहे. त्यावर नियंत्रण आणून काटेकोरपणे नियमांचे पालन केले गेले नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Violation of corona rules, order of use of masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.