लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: उत्तरप्रदेश मध्ये दहशतवाद्यांसाठी टेरर फंडिंग संदर्भात दाखल गुन्ह्यात उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने भिवंडीतून तीन युवकांना ताब्यात घेतले आहे.मोहम्मद अय्यान मोहम्मद हुसैन (२२),अबू सुफियान ताजमुल्ल (२२) व ज़ैद अब्दुल कादिर नोटियार (२२) सर्व रा.शांतीनगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेश येथे एटीएस कडून दाखल एका गुन्ह्यात भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात राहणारे ही तिघेही संशयित आहेत.त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने एटीएस पथकाने शांतीनगर पोलिस ठाण्यात या बाबत नोंद करीत ट्रांजिट रिमांड च्या माध्यमातून या तिघांना ताब्यात घेऊन गेले आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिघा संशयितांचे वय एकसमान २२ असे असल्याने तेथील एटीएस पथकाचा या तिघांवरील संशय बळावला होता.त्यानंतर चौकशीत हे तिघे टेरर फंडिंग सोबत मधील एका मोठ्या नेटवर्क सोबत जोडले गेले होते.ज्यामध्ये या तिघांवर दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्यता करण्याचा आरोप आहे. तिघांच्या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती एटीएस च्या हाती लागली आहे.त्याआधारे ताब्यात घेतलेल्या तिघांच्या बँक खाते,मोबाईल डाटा व संपर्काची कसून चौकशी केली जात आहे.स्थानिक शांतीनगर पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईची माहिती शहरात पसरणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली होती.
दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याच्या टेरर फंडिंग प्रकरणे वाढीस लागली असताना पोलिसांनी भिवंडी मधून तिघांना ताब्यात घेतल्याने पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे.