Use witchcraft to win elections | निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर, भिवंडीतील घटना

निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर, भिवंडीतील घटना

नितीन पंडित -
भिवंडी : ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरवण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील भिनार ग्रामपंचायतीमध्ये उघड झाला आहे. मात्र, या अशा जादूटोण्याला गाववाले घाबरणार नाहीत, असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. 

एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी चक्क जादूटोणा होत असेल, तर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. भिवंडीतील भिनार गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक १ मधून शिवसेना व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत जय बजरंग पॅनलचे भीमराव कांबळे, करुण भोईर व लक्ष्मी भोईर असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांना हरविण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या प्रचारपत्रकात अर्धे लिंबू कापून, हळदकुंकू व तांदूळ असा उतारा करून गावातील तलावाच्या बाजूला असलेल्या बोरीच्या झाडात फेकून दिला.

शनिवारी गावातील एक व्यक्ती बोरं खाण्यास झाडाजवळ गेली असता त्याला हा प्रकार दिसल्याने त्याने ग्रामस्थांना याबाबत सांगितले. त्यानंतर तिन्ही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणी धाव घेतली.  प्रतिस्पर्धी उमेदवार जिंकण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जातील, अशी अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी दिली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Use witchcraft to win elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.