उल्हासनगर वालधुनी नदी पात्रात भुयारी गटार पाईप? नदीचे अस्तित्व धोक्यात
By सदानंद नाईक | Updated: February 16, 2026 17:43 IST2026-02-16T17:42:55+5:302026-02-16T17:43:45+5:30
महापालिकेकडूनच नदीपात्रात अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन?

उल्हासनगर वालधुनी नदी पात्रात भुयारी गटार पाईप? नदीचे अस्तित्व धोक्यात
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात भुयारी गटार योजने अंतर्गत गटारीचे पाईप रस्ते खोदून व वालधुनी नदीच्या पात्रात टाकण्यात येत आहे. या भुयारी गटारीच्या पाईपमुळे नदीचे पात्र अरुंद व उथळ होऊन पावसाळ्यात पुराचा फटका नदी किनारील हजारो नागरिकांना बसण्याची धोका समाजसेवक शिवाजी रगडे यांनी ओळखून महापौर व आयुक्ताना तसे निवेदन दिले आहे.
उल्हासनगराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी पावसाळ्यात विशाल रुप धारण करून किनाऱ्यावरील शेकडो नागरिकांचे संसार दरवर्षी उघड्यावर आणत आहे. नदीच्या पुराचा फटका किनाऱ्यावरील नागरिकांना बसू नये म्हणून नदी किनारी संरक्षण भीतीची मागणी होत आहे. तर दुसरीकडे भुयारी गटार योजनेमूळे गटारीचे पाईप थेट वालधुनी पात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या या कामामुळे नदीकाठच्या अनधिकृत बांधकामधारकांना मोकळे रान मिळत असल्याचा गंभीर आरोप पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शहरात ४५० कोटीच्या निधीतून शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटार पाईप टाकण्यात येत आहे. तसेच वालधुनी नदी पात्रात सांडपाणी गटार पाईपलाईन टाकली जात आहे. हे काम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा विचार न करता पाईप टाकले जात आहेत. असा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला. या योजनेमुळे नदीपात्रात जागा तयार होत असल्याने भूमाफियांना अनधिकृत बांधकामे करण्यास पालिकेकडूनच एक प्रकारे संधी दिली जात आहे. असेही रगडे म्हणाले.
निकृष्ट दर्जाचे काम
भुयारी गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पावसाळ्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही पाईपलाईन वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन?
माननीय उच्च न्यायालयाने नदीपात्रातील कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाबाबत कडक निर्देश दिले आहेत. मात्र, या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणत्याही तांत्रिक अभ्यासाशिवाय सुरू असलेले हे काम न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
आयुक्त आणि महापौरांना निवेदन
या गंभीर प्रश्नी स्थानिक नगरसेविका सविता तोरणे-रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे, वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे व महापौर अश्विनी निकम यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लेखी स्वरूपात केली.