उल्हासनगरात मालमत्तेचा वादातून काकाची हत्या; तर दोघे जण जखमी, दोन हल्लेखोर ताब्यात
By सदानंद नाईक | Updated: March 31, 2023 15:50 IST2023-03-31T15:50:06+5:302023-03-31T15:50:54+5:30
कुटुंबात मालमत्तेवरून वाद सुरू असून तो अनेकदा विकोपाला गेला आहे.

उल्हासनगरात मालमत्तेचा वादातून काकाची हत्या; तर दोघे जण जखमी, दोन हल्लेखोर ताब्यात
उल्हासनगर : कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन इमलीपाडा परिसरात राहणाऱ्या मरोठिया कुटुंबात मालमत्तेवरून वाद विकोपाला जाऊन शुक्रवारी सकाळी ७ वाजता पुतण्याने साथीदारांसह हल्ला केला. या हल्ल्यात काका मनमिर मरोठिया याचा जागीच मृत्यू झाला असून मध्यस्थी करणारे रामपाल व राखी करोतीया हेही गंभीर जखमी झाले.
उल्हासनगर येथील फॉरवर्ड लाईन इमलीपाडा या ठिकाणी मनमिर मरोठिया हे कुटुंबासह राहतात. मरोठिया कुटुंबात मालमत्तेवरून वाद सुरू असून तो अनेकदा विकोपाला गेला आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता पुतण्या भोलू मरोठिया, शालू मरोठिया यांनी एक नातेवाईक आकाश वाल्मिकी यांच्या मदतीने मनमिर मरोठिया यांच्यासह मध्यस्थीची भूमिका वठविणाऱ्या रामपाल करोतीया व राखी करोतीया यांच्यावर हल्ला केला.
यावेळी जखमी झालेले रामपाल व राखी करोतीया यांनी जीव मुठीत घेऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तर त्या पाठोपाठ मनमिर मरोठिया हेही पोलीस ठाण्याकडे जाण्यास निघाले. दरम्यान हल्लेखोर पुतण्याने फॉरवर्ड लाईन चौकात मनमिर यांना गाठून त्यांच्यावर तलवार व लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात मनमिर मरोठिया याचा जागीच मृत्यू झाला असून करोतीया दांपत्य पोलीस ठाण्यात पोहोचल्याने, त्यांचा जीव वाचला.
मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मनमिर मरोठिया यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. या घटनेने फॉरवर्ड लाईन परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप आले. गंभीर जखमी झालेले रामपाल व राखी करोतीया या दाम्पत्यावर मध्यवर्ती रुग्णलायात उपचार सुरू आहेत. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांनी तपासाचे चक्र जलद फिरून हल्लेखोर पुतण्या भोलू मरोठिया व एक नातेवाईक आकाश वाल्मिकी यांना ताब्यात घेतले असून दुसरा पुतण्या शालू मरोठिया फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र त्यालाही लवकरच अटक करणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.