भाईंदरच्या मोर्वा गावात डेकोरेटर्सच्या अनधिकृत गोदामास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:36+5:302021-05-05T05:05:36+5:30
मीरारोड : भाईंदर पश्चिमेच्या मोर्वा गावातील एका डेकोरेटर्सच्या बेकायदेशीर गोदामास लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. ...

भाईंदरच्या मोर्वा गावात डेकोरेटर्सच्या अनधिकृत गोदामास आग
मीरारोड : भाईंदर पश्चिमेच्या मोर्वा गावातील एका डेकोरेटर्सच्या बेकायदेशीर गोदामास लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. स्थानिकांनी महापालिकेपासून अनेकांना तक्रारी करूनदेखील या गोदामावर कारवाई केली गेली नाही.
मोरवा गावातील जगदेव म्हात्रे यांच्या शागिर्द डेकोरेटर्सची या भागात अनेक बेकायदा गोदामे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सदर गोदामे सरकारी आणि खाजगी तसेच राधाकृष्ण मंदिर ट्रस्टच्या जागेत आहेत. कांदळवन, सीआरझेड क्षेत्रात ही गोदामे असूनही आजपर्यंत महापालिका, महसूल व पोलीस कारवाई करत नाहीत. गावच्या राधाकृष्ण मंदिर ट्रस्टने सातत्याने तक्रारी करूनसुद्धा पालिका व इतर यंत्रणा बेकायदा गोदामांना संरक्षण देत असल्याचे अध्यक्ष रमेश पाटील म्हणाले. याप्रकरणी पुन्हा तक्रारी करणार आहोत. लोकांचा जीव महत्त्वाचा असून प्रशासन कारवाई करणार नसेल तर ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला.
ठिकठिकाणी कोणतीही काळजी न घेता मंडप डेकोरेशनचे साहित्य आणि भंगार ठेवण्यात आले आहे. त्यातल्याच मोकळ्या जागेत ठेवलेल्या ज्वलनशील साहित्यास रविवारी सायंकाळी भीषण आग लागली व झपाट्याने पसरली. धुराचे लोट उसळल्याने परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, पाण्याचा टँकर व १७ जवानांनी मिळून आग आटोक्यात आणली. आगीत सुमारे तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाले असून अन्य सामानाचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
........