अंबरनाथ आणि बदलापुरात अघोषित भारनियमन, मागणी अधिक पण पुरवठा होतोय कमी
By पंकज पाटील | Updated: May 13, 2023 19:05 IST2023-05-13T19:04:58+5:302023-05-13T19:05:13+5:30
आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी

अंबरनाथ आणि बदलापुरात अघोषित भारनियमन, मागणी अधिक पण पुरवठा होतोय कमी
बदलापूर: उकाडा वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अघोषित भारनियमन लागू करण्यात आले आहे.
शुक्रवारी तब्बल तीन ते चार तास वेगवेगळ्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम आता वीज वापरण्यावर होत आहे. विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे वीज वितरण कंपनीला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करणे शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे. दिवसाच नव्हे तर रात्री देखील विजेचा वापर जास्त होत असल्याने आता वीज वितरण विभागाला अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी शहरातील प्रत्येक भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून विजेच्या तारांजवळ असलेल्या वृक्षांची छाटणी करण्यासाठी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. याच कारणामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याचा भास नागरिकांना झाला.
मात्र रात्री देखील तब्बल दोन ते अडीच तास वीस पुरवठा खंडित झाल्याने त्याचे नेमके कारण सर्वसामान्य नागरिकांना कळू शकले नाही. याप्रकरणी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केले असता विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ येत आहे. संपूर्ण शहर एकत्रितपणे अंधारात जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे. येत्या काही दिवसात हा अघोषित भारनियमन कायम ठेवण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.