अखेर अॅटलान्टिसच्या विकासकाविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:52 IST2018-12-05T05:52:33+5:302018-12-05T05:52:46+5:30
नवी मुंबईतील घणसोलीच्या अॅटलान्टिस टॉवरच्या विकासक कंपनीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे.

अखेर अॅटलान्टिसच्या विकासकाविरोधात गुन्हा
- नारायण जाधव
ठाणे : नवी मुंबईतील घणसोलीच्या अॅटलान्टिस टॉवरच्या विकासक कंपनीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा टॉवरच एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ (१)नुसार अनधिकृत ठरविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. त्यानंतर पालिकेच्याच तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचे नवी मुंबई महापालिकेचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
हा टॉवर अनधिकृत ठरवून त्यामधील घरे आणि दुकाने खरेदी करूनयेत, असे आवाहन आयुक्तांनी २९ नोव्हेंबर रोजी केले होते. तसेच याबाबत स्थनिक रबाळे पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यान्वये तक्रार केली. आता रबाळे पोलिसांनी बी अॅण्ड एम बिल्डकॉनविरोधात गुन्हा दाखल केला.
‘लोकमत’ने याबाबत ३० नोव्हेंबर २०१८ रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने त्याच दिवशी ऐरोली येथील दुय्यम निंबधकांना पत्र लिहून येथील सदनिका अणि दुकानांच्या खरेदी-विक्रीची नोंदणी करू नये, असे बजावले होते. तसेच बी अॅण्ड एम बिल्डकॉन कंपनीने न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आणू नये म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त अमरीश पत्निगिरे यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याबाबत संबधित विभागास कळविले होते. गुन्हा दाखल झाल्याने कंपनीच्या संचालकांची चौकशी करण्यात येणार आहे.
या टॉवरच्या अतिरिक्त चटईक्षेत्राबाबत घणसोलीतील एक नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी २०१६ पासून २०१८ पर्यंत तक्रारीही केल्या होत्या. मात्र, तरीही या टॉवरला बिनदिक्कत ओसी देऊन तेथील लोकांची फसवणूक करण्यात विकासकास हातभार लावला. आता त्यांचीही पोलीस चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच या टॉवरच्या संररचना तज्ज्ञांसह वास्तुविशारदांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.