उल्हासनगर एलबीटीतील १६ कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: October 6, 2015 23:51 IST2015-10-06T23:51:46+5:302015-10-06T23:51:46+5:30
पालिका एलबीटी विभागातील १६ कर्मचाऱ्यावर कमी वसुली, अनियमितता, निष्काळजी आदीचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे. तसेच यासह ३० कर्मचाऱ्यांची

उल्हासनगर एलबीटीतील १६ कर्मचारी निलंबित
उल्हासनगर : पालिका एलबीटी विभागातील १६ कर्मचाऱ्यावर कमी वसुली, अनियमितता, निष्काळजी आदीचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे. तसेच यासह ३० कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले आहेत.
उल्हासनगर पालिकेला एलबीटी विभागातील वसूली कमी झाल्याने दोन वर्षात १०० कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले. विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी ३० कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्याचा अहवाल आयुक्तांकडे पाठविला होता. वादग्रस्त, वांरवांर निलंबित झालेले, व्यापाऱ्यांकडून अवैध वसुली करणारे अशा १६ कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निलंबित केले आहे.
नगरसेवक सुभाष मनसुलकर, सुरेश जाधव, भगवान भालेराव, पंचशिला पवार, राजेश वानखडे, अंकुश म्हस्के, समिधा कोरडे, जयेंद्र मोरे यांनी एलबीटी विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसेच विभागाची चौकशी करून काही कर्मचाऱ्यांची नावे दिली होती. वादग्रस्त कर्मचारी बदलीनंतर त्याच विभागात एकाच महिन्यात कसे काय पुन्हा नियुक्त होतात? असा प्रश्न उपस्थितीत केला होता. त्यानुसार उपायुक्त लेंगरेकर यांनी दिलेल्या अहवालावर आयुक्तांनी कडक भूमिका घेऊन एकाच वेळी ३० कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. उपायुक्त नितिन कापडणीस यांच्या अधिकाराखाली चौकशी करण्यात येणार असल्याची प्रतिक्रीया आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. तसेच जमीर लेंगरेकर यांच्या अहवालावर निर्णय घेतल्या प्रकरणी आयुक्तांची दबंगगीरी चर्चेचा विषय झाला आहे.