उल्हासनगर महापालिकेची दबंगगिरी; थकीत मालमत्ता करासाठी भूखंडावरील झोपड्यावर कारवाई
By सदानंद नाईक | Updated: March 12, 2025 16:14 IST2025-03-12T16:14:03+5:302025-03-12T16:14:20+5:30
ज्या झोपड्यांवर कारवाई झाली त्यामधील नागरिकांनी महापालिकेच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली.

उल्हासनगर महापालिकेची दबंगगिरी; थकीत मालमत्ता करासाठी भूखंडावरील झोपड्यावर कारवाई
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर विभागाने थकीत मालमत्ता कर भरला नसल्याच्या कारणास्तव कॅम्प नं-२ येथील एका भूखंडाला नोटीस देऊन त्याचा अटकाव केला. पुढील कारवाईसाठी मालमत्ता कर विभाग व अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे मंगळवारी भूखंडावरील काही झोपड्यावर दबंगगिरी करीत पाडकाम कारवाई केली.
उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर वसुली जास्तीतजास्त होण्यासाठी तीन टप्प्यात अभय योजना लागू केली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल ४३ कोटीची वसुली झाली. तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अभय योजनेकडे मालमत्ताधारकांनी पाठ फिराविल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मालमत्ता कर विभागाने कॅम्प नं-२, टेलिफोन एक्सचेंज जवळील एका भूखंडाचा लाखो रुपयाचा मालमत्ता कर थकीत असल्याच्या कारणास्तव भूखंड मालकाला नोटीस देऊन भूखंडाचा अटकाव केला. तसेच त्याठिकाणी महापालिकेने नामफलक लावला आहे. मंगळवारी मालमत्ता कर विभाग व अतिक्रमण विभागाने, संयुक्तपणे थकीत मालमत्ता कर वसुलीच्या पुढील प्रक्रियेसाठी भूखंडावर नव्याने उभ्या राहिलेल्या काही झोपडपट्टीवर पाडकाम कारवाई केली. तशी कबुली अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली आहे.
महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी याप्रकरणी मालमत्ता कर विभाग व अतिक्रमण विभागाने नियमानुसार झोपड्ड्यावर कारवाई केली असेल, असे मत व्यक्त केले. तसेच याबाबत अधिक माहिती घेत असल्याचे सांगितले. मालमत्ता कर थकीत असलेल्या भूखंड मालकाला नोटीस देऊन भूखंडाचा अटकाव केल्यानंतर पुढील कारवाईसाठी भूखंडावरील झोपडपट्टीवर पाडकाम कारवाई करता येते का?. असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ज्या झोपड्यावर कारवाई झाली. त्यामधील नागरिकांनी महापालिका कारवाई बाबत नाराजी व्यक्त केली.