उल्हासनगर महापालिकेची तिजोरीत खळखळाट? स्मशानभूमीला दिलेला धनादेश परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 18:35 IST2021-09-28T18:32:15+5:302021-09-28T18:35:32+5:30
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू नागरिकांची कुचंबणा होऊ नये म्हणून स्मशानभूमीत मोफत लाकडे देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

उल्हासनगर महापालिकेची तिजोरीत खळखळाट? स्मशानभूमीला दिलेला धनादेश परत
- सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजपा नेत्यांनी मोठा गाजावाजा करीत कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमीला दिलेला ३ लाखाचा धनादेश न वठल्याने, महापालिकेची तिजोरीत खळखळाट झाला का? अशी टीका नगरसेवक मनोज लासी यांनी केला आहे. व्हीआयपी ठेकेदारांची कोट्यवधीचे बिले काढणाऱ्या महापालिकेच्या तिजोरीत ३ लाख रुपये शिल्लक न ठेवणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू नागरिकांची कुचंबणा होऊ नये म्हणून स्मशानभूमीत मोफत लाकडे देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. एका अंत्यसंस्कार मागे १ हजाराचे अनुदान महापालिका स्मशानभूमी ट्रस्टला देते. एकूण ३०० अंत्यसंस्कार झाल्यानंतर, लाकडाचे बिल महापालिकेला सादर करावे, अशी अट स्मशानभूमी ट्रस्टला महापालिकेने घातली. दरम्यान, मोफत लाकडाचे बिल महापालिका वेळेत देत नसल्याने, स्मशानभूमी ट्रस्टने मोफत लाकडे न देण्याची भूमिका गेल्या महिन्यात घेतली. यामुळे एकच खळबळ उडाल्यानंतर, काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीतून रखडलेले लाकडाची रक्कम धनादेशद्वारे शहरातील चारही स्मशानभूमी ट्रस्टला दिली.
कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमीला दिलेला ३ लाखांचा धनादेश २८ सप्टेंबर रोजी न वठल्याने महापालिकेची तिजोरी खाली झाली का? असा प्रश्न नगरसेवक मनोज लासी यांनी सोशल मीडियावर केला. याबाबत लासी यांच्या सोबत संपर्क साधला असता, २७० कंत्राटी सफाई कामगार ठेका व मालमत्ता सर्वेक्षण व मॅपिंग ठेक्याला मंजुरी देणाऱ्या महापालिकेत खळखळाट असल्याचा आरोप केला. तसेच, दुसरीकडे कचरा ठेक्याचे वाढीव पेट्रोल किंमती पोटी ५ कोटी पेक्षा जात रक्कम देण्याला सोमवारच्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. मात्र स्मशानभूमीला देण्यात आलेला तीन लाखाचा धनादेश का वठत नाही? असा प्रश्न मनोज लासी यांनी भाजपा नेते व महापालिका प्रशासनाला केला. तर दुसरीकडे महापालिकेचे मुख्य अधिकारी विकास चव्हाण यांनी तांत्रिक कारणामुळे चेक वठला नसावा, अशी सुरूवातीला प्रतिक्रिया दिली. तर त्यानंतर मंगळवारी दुपारी स्मशानभूमीचा धनादेश वठल्याची माहिती दिली.