उल्हासनगर महापालिकेचा सावळागोंधळ उघड, लॉटरी पद्धतीने महिला बचत गटांना मिळणार स्टॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 23:29 IST2025-10-29T23:26:21+5:302025-10-29T23:29:44+5:30
उल्हासनगर महापालिका महिला बाल विकास विभागाने, महिला बचत गटांना आठ बाय आठ आकाराचे एकूण ५० लोखंडी स्टॉल देण्याचा निर्णय घेतला आहे.

उल्हासनगर महापालिकेचा सावळागोंधळ उघड, लॉटरी पद्धतीने महिला बचत गटांना मिळणार स्टॉल
उल्हासनगर : लोखंडी स्टॉलचे वाटप केले नसल्याच्या निषेधार्थ महिला बचत गटातील महिलांनी आक्रमक होत महापालिका व आमदार आयलानी यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर लोखंडी स्टॉल एका आठवड्यात लॉटरी पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला असून महापालिकेचा सावळागोंधळ उघड झाला.
उल्हासनगर महापालिका महिला बाल विकास विभागाने, महिला बचत गटांना आठ बाय आठ आकाराचे एकूण ५० लोखंडी स्टॉल देण्याचा निर्णय घेतला. महापालिकेकडे एकूण १३०० महिला बचत गटाची नोंदणी असून स्टॉलसाठी ६५ अर्ज आले होते. त्या स्टॉलचे वाटप ९ महिन्यापूर्वी झाली. मात्र त्याचा ताबा लाभार्थी महिला बचत गटाला दिला नाही.
महिला बचत गटांनी आक्रमक भूमिका घेऊन समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिके समोर ठिय्या आंदोलन केले. आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधातही महिलांनी घोषणाबाजी करून वाटप प्रक्रियेत आमदारांनी खोडा घातल्याचा आरोप केला होता. अखेर महापालिका प्रशासन, आमदार कुमार आयलानी व महिला बचत गटांनी चर्चा करून लॉटरी पद्धतीने एका आठवड्यात स्टॉलचे वाटप करण्याचा निर्णय घेतला.
स्टॉल वाटप प्रक्रिया रखडली
महापालिकेच्या सावळा गोंधळाचा प्रत्येक पुन्हा एकदा शहरवासियांना आला असून महापालिका कारभारावर टिका होत आहे. गेल्या एका वर्षापासून लोखंडी स्टॉल उघड्यावर पडले असून पावसाने ते भंगारात निघण्याची शक्यता निर्माण झाली. आयुक्त मनिषा आव्हाळे याबाबत काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पात्र महिला बचत गटांना स्टॉल...आमदार आयलानी
शहरांत एकूण १३०० महिला बचत गट असतांना फक्त ५० महिला बचत गटांना महापालिकेकडून लोखंडी स्टॉल का? असा प्रश्न आयलानी यांनी केला. पात्र महिला बचत गटांना स्टॉल देण्याचे संकेत आयलानी यांनी दिले.