उल्हासनगर महापालिकेच्या बुलडोझर कारवाई ३१ कुटुंबे उघड्यावर, अनेक कुटुंबाचा ठिय्या
By सदानंद नाईक | Updated: March 9, 2026 19:56 IST2026-03-09T19:55:48+5:302026-03-09T19:56:13+5:30
Ulhasnagar News: महापालिकेने विकास कामात अडथळा ठरलेल्या ३१ घरावर महापालिकेने बुलडोझर फिरवून संसार उघड्यावर आणला. त्यांना पर्यायी घरे नसल्याने, बहुतांश कुटुंबानी घराच्या ढीगाऱ्यावर उघड्यावर लहान मुलासह संसार थाटल्याचे भयानक दृश्य दिसत आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या बुलडोझर कारवाई ३१ कुटुंबे उघड्यावर, अनेक कुटुंबाचा ठिय्या
उल्हासनगर - महापालिकेने विकास कामात अडथळा ठरलेल्या ३१ घरावर महापालिकेने बुलडोझर फिरवून संसार उघड्यावर आणला. त्यांना पर्यायी घरे नसल्याने, बहुतांश कुटुंबानी घराच्या ढीगाऱ्यावर उघड्यावर लहान मुलासह संसार थाटल्याचे भयानक दृश्य दिसत आहे.
उल्हासनगर महापालिकेने प्राचिन शिवमंदिर विकास प्रकल्प वालधुनी विकास कामाच्या आड येणाऱ्या ३१ घरावर पाडकाम कारवाईची मागणी अंबरनाथ नगरपरिषदेणे उल्हासनगर महापालिका आयुक्ताना केली होती. त्यानुसार ३१ घरावर बुलडोझर फिरला असून शेकडो जणा बेघर झाले आहेत. पात्र घरांना पर्यायी घरे देण्याचे आश्वासन अंबरनाथ नगरपरिषददेने दिले आहे. प्रत्यक्षात पाडकाम कारवाई झालेल्या नागरिकांना पर्यायी घरे नसल्याने, आपल्याच घराच्या ढिगाऱ्यावर उघड्यात संसार थाटला आहे. दिवसा कडक उन्हात आजूबाजूच्या सावलीत आडोशाला काढल्यानंतर रात्री त्याचा घराच्या ढीगाऱ्यावर संसार थाटला जात असून त्याच ठिकाणी झोपत आहेत.
डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी
महापालिकेच्या या कारवाईने शेकडो नागरिक आता उघड्यावर आले आहेत. अनेक महिलांनी आयुष्यभराची पुंजी जमवून उभी केलेली घरे मलब्यात बदलताना पाहून हंबरडा फोडला. विशेष म्हणजे, अनेक दशकांपासून येथे राहणाऱ्या या कुटुंबांना पर्यायी जागा न देताच ही कारवाई केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
गटाराच्या काठी आणि उघड्यावर मुक्काम
सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. कडाक्याच्या उन्हात इतर घरांच्या आडोशाला तर रात्रीच्या वेळी अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन गटाराच्या काठी किंवा उघड्या मैदानावर दिवस काढत आहेत. खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने, कोणी मदत केली तरच या कुटुंबांच्या पोटाची खळगी भरत आहे, अन्यथा त्यांना उपाशी पोटी राहावे लागत आहे.
सरकारच्या योजनांवर संतप्त सवाल
बाधित महिलांनी आपला संताप व्यक्त करताना सरकारवर टीकास्त्र सोडले. एकडे सरकार आम्हाला लाडकी बहीण म्हणते आणि दुसरीकडे आमच्या डोक्यावरचे छप्पर हिरावून घेते. महिला दिनाच्या काळातच आमच्यावर ही वेळ आली, हा कसला सन्मान?" असा संतप्त सवाल या महिलांनी विचारला आहे.