उल्हासनगर महापालिका सीएसआर उपक्रमातून करणार १० प्रमुख चौकाचे सौंदर्यकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:03 IST2025-11-01T17:02:27+5:302025-11-01T17:03:29+5:30
महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सीएसआर (कार्पोरेट सामाजिक जबाबदारी) या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख १० चौकाचे सौंदर्याकरण करण्याचा निर्णय घेतला.

उल्हासनगर महापालिका सीएसआर उपक्रमातून करणार १० प्रमुख चौकाचे सौंदर्यकरण
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सीएसआर (कार्पोरेट सामाजिक जबाबदारी) या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख १० चौकाचे सौंदर्याकरण करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात शुक्रवारी आयुक्तानी काही शासकीय व खाजगी बँक अधिकाऱ्यां सोबत बैठक घेतली.
उल्हासनगरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली असून शहर विकास आराखड्याच्यानुसार रस्ते बांधण्यात न आल्याने, भविष्यात मोठा प्रश्न उभा ठाकणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. प्रमुख १० चौक सीएसआर निधीतून विकाशित करण्याचा निर्णय आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी घेतला. सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, ज्या अंतर्गत कंपन्या सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांसाठी त्यांच्या नफ्यातील काही भाग खर्च करतात. भारतात कंपनी कायदा २०१३ नुसार, विशिष्ट उत्पन्न आणि नफा असलेल्या कंपन्यांना त्यांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान २ टक्के रक्कम सीएसआर निधी म्हणून खर्च करणे बंधनकारक आहे. या निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रातील सामाजिक समस्या सोडवण्यासाठी केला जातो.
महापालिका क्षेत्रात सीएसआर उपक्रमांतर्गत विविध योजना राबविण्यासाठी आयुक्त मनिषा आव्हाळे यांचे अध्यक्षतेखाली महापालिका हद्दीतील सार्वजनिक व खाजगी बँक व्यवस्थापक तसेच विकासकांची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीस मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, सहायक संचालक नगररचना विकास बिरारी व नोडल अधिकारी गणेश शिंपी हे उपस्थित होते. बैठकीत १० प्रमुख चौकांचे सीएसआर उपक्रमांतर्गत सौंदर्याकरण करण्यास तत्वतः संमती दर्शविलेली आहे. सर्व बँकांना १० दिवसात सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्तानी यावेळी दिले.