उल्हासनगर महापालिकेला मिळाला नगररचनाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:51 IST2020-09-26T00:50:52+5:302020-09-26T00:51:04+5:30
गुडगुडे यांनी स्वीकारला पदभार : कामाला मिळणार आता चालना

उल्हासनगर महापालिकेला मिळाला नगररचनाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेच्या वादग्रस्त नगररचनाकार विभागाला ए.पी. गुडगुडे यांच्या रूपाने नगररचनाकार मिळाला असून त्यांनी गुरुवारी नगररचनाकारपदाचा पदभार स्वीकारला. धोकादायक इमारती व बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया यापूर्वी त्यांनी सुरू करून पालिकेला १० कोटींचे उत्पन्न मिळवून दिले होते.
महापालिका नगररचनाकार नेहमीच वादात राहिला आहे. यापूर्वीचे बहुतांश नगररचनाकार कोणत्या ना कोणत्या वादात सापडले असून अनेकांवर गुन्हे दाखल होऊन जेलची हवा खावी लागली आहे. चार वर्षांपूर्वी पुणे येथे बैठकीला गेलेले तत्कालीन नगररचनाकार संजीव करपे बेपत्ता झाले. अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांच्या कुटुंबाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. गेल्या वर्षी त्यांच्या सहीने बांधकाम परवान्याला मंजुरी मिळाल्याचा प्रकार उघड झाल्याने पुन्हा विभागाचा सावळागोंधळ उघड झाला होता. करपे यांच्या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणानंतर येथे कोणताही नगररचनाकार येण्यास धजावत नव्हता. मध्यंतरी, आलेले नगररचनाकारही वादात सापडले.
शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित असून बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रियाही ठप्प पडली होती. यापूर्वी गुडगुडे नगररचनाकारपदी असताना बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शंभरपेक्षा जास्त बांधकामे नियमित होऊन पालिकेला १० कोटींच्या दंडात्मक कारवाईतून उत्पन्न मिळवून दिले होते. तसेच दरमहा कोट्यवधींचा महसूल पालिकेला मिळत होता. मात्र, गेल्या चार वर्षांपासून नगररचनाकार विभगापासून मिळणारे उत्पन्न ठप्प झाले. दरम्यान, भिवंडी महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश देव यांच्याकडे प्रभारी नगररचनाकारपदाचा पदभार दिला होता. मात्र, त्यांनी अपवाद सोडल्यास महापालिकेच्या कामकाजाकडे पाठ फिरवली होती. महापालिकेला कायमस्वरूपी नगररचनाकार द्या, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारकडे केली होती.
‘शहर विकासासाठी हवे सहकार्य’
शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांचे सहकार्य हवे. नवीन बांधकाम परवानगी, धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढणे आदी अनेक कामे करावी लागणार आहेत. विभागाचे काम अनेक दिवसापांसून ठप्प असल्याने त्याचाही निपटारा करावा लागणार आहे, असे गुडगुडे यांनी सांगितले.