उल्हासनगर महापालिकेची अनधिकृत बांधकामावर पाडकाम कारवाई
By सदानंद नाईक | Updated: June 20, 2023 17:33 IST2023-06-20T17:33:00+5:302023-06-20T17:33:34+5:30
उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, राज्य शासनाने विस्थापिताचे शहर म्हणुन बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला.

उल्हासनगर महापालिकेची अनधिकृत बांधकामावर पाडकाम कारवाई
उल्हासनगर : कॅम्प नं-२ बेवस चौकातील अवैध बांधकामावर महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी त्यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी पाडकाम कारवाई केली. महापालिका हद्दीत आरसीसीचे बहुमजली असंख्य अनधिकृत बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे आल्या असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, राज्य शासनाने विस्थापिताचे शहर म्हणुन बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला. गेल्या वर्षी अध्यादेशात बदल करून त्यामध्ये धोकादायक इमारतीचा समावेश करण्यात आला. मात्र शहरात अवैध बांधकामे थांबता थांबत नसल्याने, महापालिका कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध नियमीतपणे कारवाई सुरु ठेवण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिला. मात्र प्रत्यक्षात शहरातील विविध भागात चक्क आरसीसीचे असंख्य बहुमजली बांधकामे सुरू असल्याची टीका सोशल मीडियावर फोटोसह होत आहे. हे कमी म्हणून कीं काय, शहरातून जाणाऱ्या वालधुनी नदी किनारील भूखंडावर सर्रासपणे अवैध बांधकामे होत आहे. त्यावर कारवाई का नाही. असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. महापालिका व प्रांत कार्यालयाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे.