- सदानंद नाईकउल्हासनगर - महापालिका निवडणूक पाश्वभूमी तसेच शहरातील विविध नागरी समस्या संदर्भात काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरांत विविध विकास कामे अर्धवट असून पावसाळ्यात शहरांची दुरावस्था होणार असल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.
उल्हासनगरात हजारो कोटीच्या निधीतून विकास कामे सुरु आहेत. विकास कामाची मुदत संपूनही विकास कामे अर्धवट आहेत. भुयारी गटार योजनेच्या नावाखाली संपूर्ण शहरांत रस्ते खोदले असून एमएमआरडीए अंतर्गत मुख्य ७ रस्त्याचे कामे अर्धवट आहेत. इतर विकास कामाची हीच अवस्था असून अवैध बांधकामे जोरात सुरु आहेत. तसेच भूखंडाचे श्रीखंडाचे कारनामे दररोज उघड होत असून महापालिका नगररचनाकार विभागातील टिडीआर विषय गाजत आहे. याव्यतिरिक्त येणाऱ्या महापालिका निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
शहर काँग्रेस शिष्मंडळाने काही दिवसापूर्वी या विविध समस्या बाबत महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे ह्यांची भेट घेतली होती. यावेळी रस्त्याची दुरावस्था, बोगस डॉक्टरांवर कारवाई, भूमफिया तर्फे हडप होणारे राखीव भूखंड, दिव्यांग विभागातील गैरव्यवहारची सखोल चौकशी, सेंचुरी रेयॉन कंपनीला मालमत्ता करा मध्ये दिलेली अनियमित सूट, रिजन्सी अँटालिया प्रकल्पातील जमीन व्यवहार या विषयावर चर्चा केल्याचे रोहित साळवे यांनी प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांना सांगितले. आदी विषया बाबत स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. तसेच निवडणूक विषयी काही कानमंत्र दिल्याचे साळवे म्हणाले.