ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:28 IST2025-12-20T06:27:29+5:302025-12-20T06:28:41+5:30
मनसेला २५ जागा हव्यात

ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाविकास आघाडीची पहिली बैठक ठाण्यात शुक्रवारी पार पडली असून, या बैठकीत शरद पवार गटाने कळवा, मुंब्यातील जागांसह ठाण्यातील तब्बल ५० जागांची मागणी शरद पवार गटाने केली. उद्धवसेनेनेदेखील ५० पेक्षा अधिक जागांची अपेक्षा ठेवली, तर मनसेने २५ च्या आसपास जागांची मागणी केल्याची माहिती आहे. काँग्रेसला मुंब्यात सोबत घेण्याची तयारी शरद पवार गटाने केली आहे. तसेच ठाण्यातील काही जागांचीदेखील मागणी काँग्रेसने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान, उद्धवसेनेचे नेते राजन विचारे, मनसेचे ठाण्यातील स्थानिक नेते, काँग्रेसचे पदाधिकारी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विधानसभानिहाय जागांवर चर्चा झाली. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात उद्धवसेना आणि मनसेला अधिकची मते मिळाली होती. त्यामुळे येथील जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला. तसेच उद्धवसेना आणि मनसे थोड्याफार प्रमाणात कमी अधिक जागा घेतील, अशी चर्चा बैठकीत झाली.
तसेच मुंब्र्यात काँग्रेसला मानणारा मतदार असल्याने याठिकाणी जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेसने एकूण ३० ते ३५ जागांची मागणी केली. उद्धवसेनेनेची ४५ ते ५० जागांची अपेक्षा आहे. त्या जागा कुठे आणि कोणत्या प्रभागांत असतील, त्याची चर्चा झाली. दरम्यान, जागावाटपाबाबत आणखी दोन बैठका पार पाडणार असून, लवकरच जागावाटपावर एकमत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
"महाविकास आघाडीची पहिलीच बैठक झाली. चांगल्याप्रकारे चर्चा झाली. प्रत्येक पक्षाने जागांचा फॉर्म्युला स्पष्ट केला. आम्ही मुंब्राची मागणी केली." - मनोज प्रधान, शहराध्यक्ष, शरद पवार गट, ठाणे
"पहिल्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या जागावाटपाबाबत सांगोपांग चर्चा झाली. लवकरच जागावाटपाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते जाहीर करतील." - रवी मोरे, शहराध्यक्ष, मनसे, ठाणे
"दोन बैठका अद्याप बाकी आहेत. मात्र, आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करणार असून, त्यानुसार पुढील बैठकीत जागा वाटपावर एकमत होईल." विक्रांत चव्हाण, शहराध्यक्ष, काँग्रेस, ठाणे